हैदराबाद : ‘‘भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जाणाऱ्या रॉकेटच्या मुख्य ‘फीड लाइन’मधील गळती भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी शोधून काढली. त्यामुळे उड्डाणाचे फेरनियोजन करावे लागले. रॉकेटचे तसेच उड्डाण झाले असते, तर ते मोठे संकटाचे ठरले असते,’’ अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख व्ही. नारायणन यांनी मंगळवारी दिली.

उस्मानिया विद्यापीठात पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्ला यांच्या अवकाशयानातील प्रवासाच्या विविध टप्प्यांबाबत बोलताना नारायणन म्हणाले, ‘‘या मोहिमेदरम्यान ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे पथक अमेरिकेतील केनेडी अवकाश केंद्रात होते. शास्त्रज्ञांना रॉकेटमधील त्रुटी १० जून रोजी लक्षात आली. त्यानंतर याची पूर्ण चौकशी करण्यात आली. १४ प्रश्न विचारण्यात आले. गळती कुठे झाली, याच्यासह एकाचेही उत्तर समाधानकारक देण्यात आले नाही. त्यानंतर आम्ही ही त्रुटी पूर्ण दूर करण्याची मागणी केली.

आमची भूमिका त्यावेळी स्पष्ट होती. मी या क्षेत्रात ४० वर्षांपासून काम करीत आहे. गळतीसह रॉकेटने उड्डाण केले, तर काय होते, हे मला माहीत आहे. रॉकेटला गेलेल्या तड्यामुळे ॲक्सिऑम-४ मोहीम ११ जूनपासून पुढे २५ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. या काळात ही गळती पूर्ण थांबविण्यात आली. रॉकेटचे तसेच उड्डाण केले असते, तर ते मोठे संकट ठरले असते. आज ही मोहीम यशस्वी झाली आहे.’’

चाळीस मजली रॉकेटवर काम ‘इस्रो’ ७५ हजार किलो वजन अवकाशात पाठविण्यासाठी ४० मजली इमारतीइतक्या उंच रॉकेटच्या निर्मितीवर काम करीत आहे,’ असे नारायणन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या वर्षी इस्रो विविध प्रकल्पांवर काम करीत आहे. त्यात ‘नाविक’ (नेव्हिगेशन विथ इंडिया कन्स्टेलेशन सिस्टीम) उपग्रह आणि एन-१ रॉकेटचा समावेश आहे. याखेरीज अमेरिकेचा ६५०० किलो वजनाचा संपर्कयंत्रणेसाठीचा उपग्रह अवकाशात सोडण्याचे नियोजन आहे. गुरू ग्रहाभोवतीच्या कक्षेतील मोहिमेवरही इस्रो काम करीत आहे. पुढील पिढीच्या प्रक्षेपकावरही काम होत असून, तो ७५ हजार किलो वजन अवकाशात सोडू शकेल. ४० मजली इमारतीइतके उंच ते रॉकेट असेल.’’