जय मुझुमदार, संदीप सिंह, एक्स्प्रेस वृत्त

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली : ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी बुच आणि त्यांच पती धवल बुच यांच्या व्यवहारांवर केलेल्या आरोपांनंतर अनेक बाबी समोर येत आहेत. या आरोपाच्या केंद्रस्थानी असलेल्या मॉरीशसस्थित ‘आयपीई प्लस फंड १’ या फंडामध्ये उद्याोगपती गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांनी गुंतवणूक केली होती. त्याशिवाय, याच फंडाद्वारे अदानी समूहातील कंपन्यांनी गुंतवणूक केली होती असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ला हाती लागलेल्या नोंदींमध्ये दिसून येत आहे.

अदानी समूहाने २०१६-१७पासून संशयास्पद प्रकारे पैसे वळते केलेल्या १३ परदेशी फंडांची सेबीद्वारे चौकशी केली जात आहे. त्यापैकी दोन फंडांनी ‘आयपीई प्लस फंड १’चा गुंतवणुकीसाठी वापर केला होता. कॉर्पोरेट नोंदींसह ‘इंडियन एक्स्प्रेस’ला विविध स्राोतांकडून मिळालेली माहिती, ‘ऑर्गनाईज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (ओसीसीआरपी) आणि ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने उपलब्ध करून दिलेली अतिरिक्त माहिती यावरून हे स्पष्ट होते की माधबी पुरी बुच आणि धवल बुच यांनी २०१५मध्ये केलेली गुंतवणूक विनोद अदानींनी केलेल्या लक्षणीय गुंतवणुकींशी संलग्न होती.

हेही वाचा >>>Ludhiana Woman Gangrape : संतापजनक! मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतापलेल्या वडिलाने प्रियकराच्या बहिणीसोबत केलं दुष्कृत्य

बुच यांनी गुंतवणूक केलेल्या ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंड’ या सब-फंडचा मुख्य फंड ‘ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंड’चे व्यवस्थापन मॉरीशसस्थित ‘ट्रायडंट ट्रस्ट कंपनी’तर्फे केले जात होते. याचा लाभ ‘इमर्जिंग इंडिया फोकस फंड’ आणि ‘ईएम रिसर्जंट फंड’चे मालक हे सेबीद्वारे तपास केल्या जात असलेल्या १३ परदेशी फंडांचा भाग होते. या दोन फंडांच्या तपासाचा कालावधी (किमान २०१६-१७पासून) हा बुच दाम्पत्याने गुंतवणूक केलेल्या ‘आयपीई प्लस फंड १’च्या गुंतवणुकीच्या कालावधीबरोबर (२०१५-१८) परस्परव्याप्त होता. सेबीने ऑक्टोबर २०२०पासून तपास सुरू केला, त्यावेळी बुच त्याच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. त्या २०१७मध्ये पूर्णवेळ सदस्य होण्यापूर्वी धवल बुच यांना ‘आयपीई प्लस फंड १’ खाते चालवण्याचे पूर्ण अधिकार मिळालेले एकमेव व्यक्ती होते. फेब्रुवारी २०१८मध्ये माधबी बुच यांनी फंड व्यवस्थापकांना त्यांच्या लाभासह संपूर्ण गुंतवणूक परत घेण्यास सांगितले होते. बर्म्युडास्थित ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंड लिमिटेड’ची मालमत्ता सुमारे ५२.२२ कोटी डॉलर असून तो ‘आयआयएफल कॅपिटल प्रा.लि.’द्वारे संचालित केला जाणारा हेज फंड आहे, हीच कंपनी ‘आयपीई प्लस फंडा’चेसुद्धा व्यवस्थापन करते.

सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका

भांडवली बाजारात आपल्या समभागांची किंमत वाढवण्यासाठी गैरप्रकार केल्याच्या आरोपांसंबंधी दोन प्रकरणांमध्ये अदानी समूहाची चौकशी वेगाने करण्यात यावी अशी मागणी करणारी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आली. हिंडेनबर्गच्या नवीन अहवालामुळे सामान्य जनता आणि गुंतवणूकदारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे याचिकाकर्ते विशाल तिवारी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे २२ ऑगस्टला आंदोलन

हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेच्या ताज्या अहवालामुळे ‘सेबी’च्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीसाठी २२ ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन केले जाईल. तसेच, राज्यातील ‘ईडी’च्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is clear from the records obtained by indian express that vinod adani has invested in the fund ipe plus fund 1 amy