PM Edi Rama and Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या अल्बेनियाच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी झालेल्या युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेत जॉर्जिया मेलोनी सहभागी झाल्या होत्या. या युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेदरम्यान आगळा वेगळा क्षण पाहायला मिळाला. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.

अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान एडी रामा हे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेटवर गुडघ्यावर बसून आणि हात जोडून स्वागत करताना पाहायला मिळाले आहेत. जॉर्जिया मेलोनी यांचं हे स्वागत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पंतप्रधान एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी जॉर्जिया मेलोनी यांचं कौतुक करत जागतिक नेत्यांकडून एवढा आदर सन्मान मिळत असेल तर कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. तसेच अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी केलेल्या स्वागतावर देखील अनेक युजर्सनी त्यांचंही कौतुक केलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

एडी रामा यांनी जॉर्जिया मेलोनींचं स्वागत कसं केलं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जेव्हा युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेसाठी जातात तेव्हा त्यांचं स्वागत रेड कार्पेटवर अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी केल्याचं पाहायला मिळालं. जॉर्जिया मेलोनी या गाडीमधून खाली उतरतात आणि रेड कार्पेटवरून चालत जातात. पुढे त्यांच्या स्वागतासाठी एडी रामा हे उभे असतात.

जॉर्जिया मेलोनी येताच अचानक पंतप्रधान एडी रामा हे गुडघ्यावर बसतात आणि हात जोडून त्यांचं स्वागत करतात. तेव्हा त्यांच्याजवळ एक छत्री देखील पाहायला मिळाली. तेव्हा जॉर्जिया मेलोनी यांना देखील आश्वर्याचा धक्का बसतो. त्यानंतर दोन्ही नेते हस्तांदोलन करतात, गळाभेट घेतात आणि एकत्र फोटो काढतात. दरम्यान, जॉर्जिया मेलोनी यांच्या या भव्य स्वागताची सोशल मीडियावर चर्चा सुरु रंगली आहे.