Giorgia Meloni wishes PM Modi on Birthday : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१७ सप्टेंबर) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलं असून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशभरातील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी, क्रिकेटपटू व कलाकारांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पहाटे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदी यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाठोपाठ आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील मोदी यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत प्रेरणा मिळत राहो”, अशी आशा मेलोनी व्यक्त केली आहे. मेलोनी यांनी नरेंद्र मोदी हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याची टिप्पणी करत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफार्मवर पोस्ट करून मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलं आहे की “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची ताकद, निर्धार आणि कोट्यवधी लोकांचं नेतृत्व करण्याची क्षमता आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांना चांगलं आरोग्य आणि ऊर्जा मिळो. ते भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेत राहतील असा मला विश्वास आहे. तसेच त्यांच्यामुळे भारत व इटली या दोन्ही देशांमधील संबंध खूप दृढ होतील अशी आशा देखील आहे.

‘माय फ्रेंड मोदी’ म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शुभेच्छा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या. स्वतः मोदी यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टमधून मोदी यांनी ट्रम्प यांचे शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल आभार मानले आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील फोनवरील संभाषणात युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. तर तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत व अमेरिकेतील व्यापक व जागतिक भागिदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की , “माझे मित्र, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही फोन केल्याबद्दल आणि मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल मी आभारी आहे.”