जनता दलाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया योग्य मार्गावर असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी येथे वार्ताहरांना सांगितले.
दिल्लीतील आपल्या वास्तव्यात सपाचे नेते मुलायमसिंह यादव, राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरली आहे. त्याचप्रमाणे जद(यू)मध्येही याबाबतची चर्चा सुरू आहे, असे नितीशकुमार म्हणाले.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नितीशकुमार त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
जनता दलातील घटक पक्षांच्या नेत्यांची १५ एप्रिल रोजी बैठक झाली त्यामध्ये सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांना एकत्रित जनता दलाचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले. गेले तीन दिवस नितीशकुमार, मुलायमसिंह, लालूप्रसाद आणि शरद यादव यांच्यात पक्षाचे समान चिन्ह आणि ध्वज याबाबत चर्चा झाली. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांनी जागावाटपाचीही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते, असे कळते.