जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी गुरुवारी अधिकृतपणे जपानची संसद बरखास्त केली. त्यामुळे जपानमध्ये मध्यावधी निवडणुका अटळ असून त्यांच्यासमोर टोकियोच्या लोकप्रिय गव्हर्नरचे आव्हान आहे.
जपानच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांनी ‘बानझाई’ अशी घोषणा तीन वेळा हात उंचावून दिली. सभागृहाच्या अध्यक्षांनी अबे यांचे संसद बरखास्त करीत असल्याबद्दलचे अधिकृत पत्र वाचून दाखविले.
जपानमध्ये येत्या २२ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर कोरिया आणि करप्रणालीची नवी योजना याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत शिंझो अबे यांना जनमताचा कौल घ्यावयाचा आहे. अत्यंत कठीण समर सुरू झाले असल्याचे अबे यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
जनतेच्या जिवाचे संरक्षण कसे करावयाचे यासाठीची ही निवडणूक आहे, उत्तर कोरियाकडून धोका असल्याने आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायाशी सहकार्य करावे लागेल, असेही अबे म्हणाले.
उत्तर कोरियाबाबत आपण जी कठोर भूमिका घेतली आहे त्याला जनतेने पाठिंबा द्यावा. उत्तर कोरियाने जपानला सागरात बुडविण्याची धमकी दिली आहे आणि होक्काईदो बेटांवर एका महिन्याच्या कालावधीत दोनदा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे, त्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी लढा देण्याची गरज आहे, असेही अबे म्हणाले.
अबे यांनी मध्यावधी निवडणुका घेण्याचे जाहीर करून जपानला धक्का दिला, विरोधी पक्ष दुबळे असल्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे, उत्तर कोरियाबाबतच्या त्यांच्या धोरणाला मतदारांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान, टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोइके यांनी ‘पार्टी ऑफ होप’ स्थापन करून अबे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. जपानचे राजकीय चित्र बदलण्याची या पक्षाची इच्छा आहे. त्यामुळे अबे यांना कोइको यांनी पर्याय दिल्याचे मानले जात आहे.