Javed Akhtar on Taliban leader Amir Khan Muttaqi India Visit : तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. भारतात तालिबानच्या या प्रतिनिधीचं झालेलं स्वागत अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं. भारताच्या भूमीवरून त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तसेच शुक्रवारी (१० ऑक्टोबर) त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना सहभागी होण्यास मनाई करण्यात होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. दरम्यान, मुत्ताकी यांचं भारत सरकारने केलेलं आदरातिथ्य पाहून प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
जावेद अख्तर म्हणाले, “जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीला भारतात दिलेला सन्मान पाहून मला लाज वाटतेय.” अख्तर यांनी केवळ तालिबनाविरोधात संताप व्यक्त केला नाही. तर, त्यांनी भारत सरकार व स्वतःला दहशतवादविरोधी म्हणवून घेणाऱ्या संस्थांवरही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
जावेद अख्तर यांचा देवबद संस्थेवर संताप
अख्तर यांनी देवबंद संस्थेवर (दारुल उलूम देवबंद ही एक इस्लामी संस्था आहे जीला तालिबानच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती) टीका केली आहे. कारण या संस्थेने तालिबनाच्या प्रतिनिधीला ‘इस्लामिक हिरो’ म्हणत त्यांचं स्वागत केलं होतं. जावेद अख्तर यांच्या मते अशा व्यक्तीचा सत्कार करणं म्हणजे महिलांच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांना मान्यता देण्यासारखं आहे.
जावेद अख्तर यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी अमीर खान मुत्ताकी आणि त्यांचं स्वागत करणारं भारत सरकार, मुत्ताकी यांना ‘इस्लामिक हिरो’ म्हणणाऱ्या देवबंद संस्थेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
जावेद अख्तर काय म्हणाले?
“जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीचं भारतात ज्या प्रकारे सन्मानाने स्वागत केलं गेलं आहे, त्या व्यक्तीला जो आदर दिला गेला ते पाहून मला लाज वाटतेय. जे लोक (भारत सरकार) प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात उभे राहतात, तेच आज या दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीचा सन्मान करत असल्याचं दिसत आहे. हे अतिशय दु:खद आहे.”
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर म्हणाले, “देवबंदलाही लाज वाटली पाहिजे, कारण त्यांनी अशा कथित ‘इस्लामिक हिरो’चं आदरपूर्वक स्वागत केलं आहे, जो त्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी अफगाणिस्तानमध्ये मुलींचं शिक्षण पूर्णपणे बंद केलं आहे. माझ्या भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्याला काय झालंय? आपल्या देशात हे काय चाललंय?”