तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर अद्यापही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांनी चुकीचे वृत्त दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर अपोलो रुग्णालयाने जयललिता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट केले आणि अफवांचा बाजार थंडावला.
गेल्या दोन महिन्यापासून अपोलो रुग्णालयात भरती असलेल्या जयललिता यांना रविवारी संध्याकाळी ह्रदविकाराचा तीव्र झटका आला. जयललिता यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृहमंत्र्यांनी तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी असलेले सी विद्यासागरराव यांना तात्काळ तामिळनाडूला जाण्याचे आदेश दिले. सी विद्यासागर यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. या दरम्यानच्या काळात रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. तसेच तामिळनाडू पोलिसांना हायलअलर्टचा इशारा देण्यात आला. जयललिता यांच्यावर उपचार करण्यासाठी लंडनमधील ह्रदयरोगविषयक तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बेले यांची मदत घेतली जात आहे. जयललिता यांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती डॉ. बेले यांनी दिली.
सोमवारी संध्याकाळी जयललिता यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरू लागल्याने रुग्णालयाबाहेरील परिस्थिती तणावपूर्ण बनली. संतप्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयाजवळ लावलेले बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.एआयएडीएमकेच्या पक्ष कार्यालयाबाहेरील पक्षाचा झेंडाही अर्ध्यावर उतरवण्यात आल्याने तणावात भर पडली. मात्र काही वेळातच हा झेंडा पुन्हा वर घेण्यात आला. दुसरीकडे एआयएडीएमकेच्या आमदारांची सोमवारी संध्याकाळी बैठक पार पडली. तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयी या बैठकीत विचारमंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीदेखील सोमवारी संध्याकाळी अपोलो रुग्णालयात जाऊन जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.
६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिले जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली होती. मात्र रविवारी संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजताच अपोलो रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पूजाअर्चनाही सुरु झाल्या आहेत.
Live Updates
जयललिता यांची प्रकृती चिंताजनक, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु: अपोलो रुग्णालयाची माहिती
व्यंकय्या नायडू जयललिता यांच्या प्रकृतीविषयीची माहिती पंतप्रधानांना देणार.
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू अपोलो रुग्णालयात, जयललिता यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतल्यावर नायडू रुग्णालयातून बाहेर पडले
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अजूनही चिंताजनक, त्यांच्या प्रकृतीविषयी काही प्रसारमाध्यमांमध्ये येणारे वृत्त निराधार आणि खोटे – अपोलो रुग्णालय
संतप्त कार्यकर्त्यांचा अपोलो रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले.
अपोलो रुग्णालयाबाहेर एआयएडीएमकेचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांना सतर्कतेचा इशारा
चेन्नईतील अपोलो रुग्णालयाबाहेर एआयएडीएमके कार्यकर्त्यांची गर्दी वाढली.
जयललितांनी मला पोटा कायद्यांतर्गत अटक केली होती, पण राजकारणापलीकडे मी त्यांना बहीण मानतो, त्या या संकटातूनही बाहेर येतील: एमडीएमके प्रमुख वायको
जयललिता यांची प्रकृती चिंताजनकच, पण त्यांना वाचवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु – डॉ. रिचर्ड बेले
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती चिंताजनक, जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे: अपोलो रुग्णायलाची माहिती
अपोलो रूग्णालयाच्या नव्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांची माहिती
जयललितांची प्रकृती स्थिर, कोणताही धोका नाही; अण्णाद्रमुकच्या प्रदेशाध्यक्षांची माहिती
एम्सच्या
डॉक्टरांचे एक पथक आज चेन्नईला जाणार. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा
यांची माहिती
तामिळनाडूतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दुतावासातील दैनंदिन व्यवहार बंद; अमेरिकन नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना
एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांची सकाळी ११ वाजता बैठक
दगडफेकीमुळे तामिळनाडूकडे जाणारी बससेवा बंद
अपोलो रुग्णालयाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद