Jhansi Train Viral Video : समाजमाध्यमांवर व्हायरल होण्यासाठी, रील बनवण्यासाठी रीलस्टार किंवा कॉन्टेट क्रिएटर काय करतील याचा नेम नाही. देशात या रीलस्टार्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काहीजण व्हायरल होण्यासाठी विचित्र गोष्टी करताना, अंगविक्षेप करताना दिसतात, तर काहीजण भर रस्त्यात, धावत्या वाहनांसमोर रील बनवून व्यवस्थेला वेठीस धरतात. काही रीलस्टार व्हायरल होण्यासाठी शिवराळ भाषेत रील्स बनवतात, अशा रीलस्टार्सवर पोलिसांकडून कारवाई झाल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे.
अलीकडेच समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुण ट्रेनमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. तरुणाचं हे कृत्य पाहून ट्रेनमधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करत संताप व्यक्त केला. काहींनी रेल्वे प्रशासनाचं या घटनेकडे लक्ष वेधलं आणि कारवाईची मागणी केली आहे.
ट्रेनमध्ये केली अंघोळ
या व्हिडीओमध्ये दिसतंय की एक तरूण बादली घेऊन ट्रेनमध्ये चढला आहे. बादली पाण्याने भरलेली आहे. हा तरुण अर्धनग्न अवस्थेत असून त्याने बादलीतून पाणी अंगावर घेतलं. त्यानंतर केसांना शॅम्पू लावला आणि त्यानंतर तो शॅम्पू धुतला. त्याने धावत्या ट्रेनमध्येच अंघोळ केली. घरी, बाथरूममध्ये अंघोळ करतात अगदी तशीच अंघोळ त्याने धावत्या ट्रेनमध्ये दरवाजाजवळच्या जागेत केली.
समाजमाध्यमांवर लोकांकडून नाराजी व्यक्त
या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी या मुलाची टर उडवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘लोक व्हायरल होण्यासाठी काय-काय करतात बघा’, ‘हा तरुण पाण्याने भरलेली बादली कुठून घेऊन आला?’, ‘त्याच्या या कृत्यावर ट्रेनमधील प्रवाशांची काय प्रतिक्रिया होती?’, ‘रेल्वे प्रशासन अशा लोकांवर कारवाई करेल का?’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर वाचायला मिळत आहेत.
आरपीएफ कारवाई करण्याच्या तयारीत
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) त्याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली असून कारवाईस सुरुवात केली आहे. ही घटना वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर घडल्याचं समोर आलं आहे.
