Wife Poisons Husband To Death: काही दिवसांपूर्वी इंदूरच्या राजा रघुवंशी याची त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या साथीने हनिमूनला गेल्यानंतर मेघालयात हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेला काही दिवस उलटले नाहीत तोपर्यंत झारखंडमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
झारखंडमध्ये लग्नाच्या अवघ्या ३६ दिवसांनी एका २२ वर्षीय महिलेने तिच्या पतीला विष देऊन मारल्याचा आरोप आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. सुनीता असे या आरोपी पत्नीचे नाव असून, सोमवारी संध्याकाळी तिला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची आई राजमती देवी यांनी त्यांच्या सुनेवर हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
एफआयआरनुसार, रांका पोलीस स्टेशन हद्दीतील बाहोकुंदर गावातील रहिवासी असलेली पीडित बुधनाथ सिंग याचा ११ मे २०२५ रोजी छत्तीसगडच्या सुनीता हिच्याशी झाला होता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनीता तिच्या आईवडिलांच्या घरी परतल्यानंतर वाद सुरू झाला. तिने लग्नाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, तिला बुधनाथ अजिबात आवडत नाही आणि ती त्याच्यासोबत राहणार नाही.
यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी हे लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. ५ जून रोजी पंचायत झाली, त्यानंतर सुनीता बुधनाथसह तिच्या माहेरी परतली. यानंतर १४ जून रोजी हे जोडपे छत्तीसगडमधील रामानुजगंज बाजारात गेले होते. तेव्हा सुनीताने शेतीसाठी कीटकनाशकाची गरज असल्याचे सांगत बुधनाथला बाजारातून कीटकनाशक खरेदी करण्यास राजी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
१५ जूनच्या रात्री पत्नी सुनीताने पती बुधनाथच्या जेवणात कीटकनाशक मिसळल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बुधनाथ मृतावस्थेत आढळला होता.
मृताच्या पत्नीच्या अटकेबाबत बोलताना रांका पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणाले की, “आम्ही मृताच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन केले जात आहे. अहवाल आल्यानंतर आम्हाला मृत्यूचे कारण कळेल.”