कीव्ह : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना भेटण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी त्या देशाला ‘आकस्मिक’ भेट दिली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या पाच दिवस आधी, युक्रेनसोबत ऐक्यभावना दर्शवण्यासाठी त्यांनी ही कृती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बायडेन यांनी मारिन्स्की राजवाडय़ात झेलेन्स्की यांची भेट घेऊन युक्रेनला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली, तसेच संघर्ष सुरू असताना युक्रेनला अमेरिकेकडून तसेच मित्रदेशांकडून मदत देण्याचे पुन्हा आश्वासन दिले.

रशियाच्या आक्रमण फौजा युक्रेनची राजधानी लवकरच ताब्यात घेतील, अशी भीती एका वर्षांपूर्वी व्यक्त करण्यात आली होती. मात्र एका वर्षांनंतर, कीव्ह अजून खंबीरपणे टिकून आहे. ‘युक्रेन टिकून आहे, लोकशाही टिकून आहे. अमेरिकी लोक आणि सारे जग तुमच्यासोबत उभे आहे’, असे बायडेन म्हणाले.

रशिया व युक्रेन हे दोन्ही देश एकमेकांवर नव्याने आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याने त्यांच्यातील युद्ध तीव्र होण्याची अपेक्षा आहे. अशा वेळी आपल्या मित्रदेशांना युक्रेनला मदतीसाठी एकत्र ठेवण्याचा बायडेन यांचा प्रयत्न असल्याने त्यांचा युक्रेन दौरा महत्त्वाच्या प्रसंगी होत आहे.

 मित्रदेशांनी ज्या शस्त्रास्त्र यंत्रणा देण्याचे मान्य केले होते, त्यांचा पुरवठा जलदगतीने करावा यावर झेलेन्स्की भर देत असून, आपल्याला लढाऊ विमाने देण्याचे आवाहन त्यांनी पाश्चिमात्य देशांना केले आहे. बायडेन यांनी मात्र अद्याप तसे केलेले नाही.

‘दीर्घ पल्ल्याची शस्त्रे आणि यापूर्वी पुरवठा न केलेली, मात्र अजूनही युक्रेनला पुरवली जाऊ शकतील अशी शस्त्रे’ यांबाबत आपण व बायडेन यांच्यात चर्चा झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले, मात्र याबाबतचे तपशील त्यांनी सांगितले नाहीत.

दौऱ्याच्या तयारीत गोपनीयता 

जो बायडेन यांच्या युक्रेन भेटीबाबत व्हाईट हाऊसच्या स्तरावरही मोठी गुप्तता राखण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे व्हाईट हाऊसमधील अत्यंत मोजक्या अधिकाऱ्यांनाच या दौऱ्याची कल्पना देण्यात आली होती. शुक्रवारी बायडेन यांच्या पोलंड दौऱ्याविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत वार्ताहरांनी हा दौरा पोलंडच्या पलीकडे असेल काय, अशी विचारणा केली होती. त्यावर व्हाईट हाऊसचे सुरक्षा परिषद प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले होते की, आता तरी हा दौरा वॉर्सापुरता आहे. पण बायडेन यांचा युक्रेन दौरा नियोजित नव्हता, असेच व्हाईट हाऊसकडून वारंवार सांगण्यात आले. सोमवारी सकाळी कीव्हमधील मध्यवर्ती रस्ते कोणताही अधिकृत माहिती न देता बंद करण्यात आले. त्या ठिकाणाहून मोटीरींचे मोठे ताफे जात असल्याच्या ध्वनिचित्रफिती त्यानंतर समाजमाध्यमांवर आल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe biden makes surprise visit to ukraine showing strong support against russia zws