पाकिस्तानात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि अन्नाच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या जीवला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या शिंजियांग प्रांताला लागून असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये आतापर्यंत ८०० जणांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. पण तिथे परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीय.
पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गिलगिट-बाल्टिस्तान या भागात फक्त दोन जुने व्हेंटिलेटर आहेत. पाकिस्तान सरकारकडून गिलगिट-बाल्टिस्तानला कुठलीही वैद्यकीय मदत मिळत नाहीय.
डॉ. अमजद अयुब मिर्झा या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या डॉक्टरने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये फक्त दोन जुने व्हेंटिलेटर असल्याचा टि्वट करुन दावा केला आहे. “सरकारला मोठया प्रमाणावर देणगीच्या रुपाने पैसा मिळतोय. पण हा सर्व पैसा ते स्वत:च्या उद्देशांसाठी वापरतायत. जनकल्याणासाठी कुठलीही मदत मिळत नाहीय” असे मोहम्मद बाकर मेहेंदी यांनी सांगितले. गुरुवारपर्यंत पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ८५,२६४ होती. मागच्या २४ तासात तिथे ४,६८८ नव्या रुग्णांची नोंद झाली व ८२ जणांचा मृत्यू झाला.