Kangana Ranaut plea dismissed by Punjab and Haryana high court : अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रणौतने दाखल केलेली याचिका शुक्रवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या एका टीप्पणीनंतर तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. यावर कंगना रणौतने न्यायालयात धाव घेत ही तक्रार रद्द करण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती रद्द केल्याने आता प्रकरणातील खटला पुन्हा सुरू होईल. यामुळे कंगनाच्या अडचणी वाढू शकतात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, उच्च न्यायालयाने एका विस्तृत आदेशात निरीक्षण नोंदवले की, ” याचिकाकर्ता, ज्या एक सेलिब्रेटी आहेत, यांच्या विरोधात काही विशिष्ट आरोप करण्यात आले आहेत की, त्यांनी रिट्विटमध्ये केलेल्या खोट्या आणि बदनामीकारक आरोपांमुळे प्रतिवादीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचली आणि त्यांच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या नजरेत देखील त्यांची प्रतिष्ठा कमी झाली. त्यामुळे त्यांच्या हक्कांच्या समर्थनात अशी तक्रार दाखल करणे हे वाईट भावनेने केल्याचे म्हणता येणार नाही.”

भटिंडा जिल्ह्यातील बहादुरगड जांदियान गावातील महिंदर कौर (७३) यांनी कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला होता. नंतर डिलीट केलेल्या एका ट्विटमध्ये कंगनाने कौर यांचा फोटो शेअर केला होता. तसेच ट्विट केले होते की अशा महिलांना १०० रुपयांत आंदोलनसाठी आणले जाऊ शकते.

फेब्रुवारी २०२२ मध्ये, भटिंडा ज्युडिशीयल मॅजिस्ट्रेट यांनी कंगनाला न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते, त्यानंतर अभिनेत्री कंगनाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता कंगनाची याचिका फेटाळण्यात आल्यानंतर, तिला पंजाबमधील स्थानिक न्यायालयात या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून भाजपा खासदार असलेल्या कंगनाला उच्च न्यायालयाने दिलासा न दिल्याने आता मानहानीचे प्रकरण पुन्हा उघडले जाईल. कंगनाच्या विरोधात हे प्रकरण २०२१ पासून प्रलंबित आहे. शेतकरी आंदोलनावेळी कंगनाने एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला होता की या महिलांना पैसे देऊन आंदोलनस्थळी आणण्यात आले होते.