Karnataka Blames RCB For Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)ने २०२५ च्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरू येथे हा विजय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला होता, मात्र यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जण जखमी झाले होते. दरम्यान या चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने एक रिपोर्ट उच्च न्यायालयात सादर केला आहे. ज्यामध्ये चेंगराचेंगरीसाठी आरसीबी संघालाच जबाबदार धरण्यात आले आहे.
आरसीबीने एकट्यानेच शहर पोलिसाचा सल्ला न घेता किंवा त्यांची परवानगी न घेता लोकांना चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजय उत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते, असे कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा अहवाल गुप्त ठेवावा अशी विनंती न्यायालयाकडे केली होती, पण न्यायालयाने अशी गुप्तता पाळण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे सांगत ही विनंती नाकारली.
रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?
राज्य सरकारने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, आरसीबी व्यवस्थापनाने ३ जून रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. याच दिवशी आरसीबीने १८ वर्षात पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा जिंकली होती. आरसीबीने पोलिसांनी विजयी रॅलीच्या शक्यतेबद्दल कल्पना दिली होती. पण याचे स्वरूप हे कायद्याने आवश्यक असलेल्या परवानगीची मागणी करणारे नव्हते, तर जाहीर केल्याप्रमाणे होते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी अशा परवानग्या घेणे आवश्यक असते असेही या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणात अर्जदार/आयोजक यांनी परवानगी देणाऱ्या अधिकार्याकडे निश्चित केलेल्या फॉरमॅटमध्ये कोणताही अर्ज दाखल केलेला नाही. ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये आवश्यक माहिती सादर केलेली नसल्याने, अशा प्रकारच्या विनंतीवर सकारात्मक विचार करणे परवानगी देणार्या अधिकार्यांना शक्य नव्हते, असे सरकारने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
यामुले Cubbon पार्क पोलिस स्टेशनच्या पीआयने ३ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता केएससीएने केलेल्या विनंतीला परवानगी दिली नाही, त्याचे कारण म्हणजे, त्यावेळी अपेक्षित अंदाजे गर्दी, कार्यक्रमासाठी करण्यात आलेली पूर्वतयारी, अपेक्षित बॉटलनेक आणि अंतिम सामन्याचा निकाल काय लागेल, जसे की आरसीबी जिंकेल किंवा नाही, याबद्दल माहिती उपलब्ध नव्हती, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पोलिसांना न कळवता लोकांना बोलवलं
रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, पोलिसांशी चर्चा न करताच आरसीबीने दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०१ वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी लोकांना मोफत प्रवेश आहे आणि लोकांना विधान सौधा येथून सुरू होणाऱ्या आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर संपणाऱ्या विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
दुसरी पोस्ट ४ जून रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आली, ज्यामध्ये आरसीबीने त्यांच्या अधिकृत हँडलवरून क्रिकेटपटू आणि आरसीबी संघाचा सदस्य विराट कोहलीचा एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने म्हटले की, संघाला हा विजय बंगळुरू शहरातील लोकांबरोबर आणि आरसीबी फॅन्स बरोबर साजरा करायचा आहे, असे पोस्टमध्ये म्हटले होते, असे रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे.
“त्यानंतर, आरसीबीने ४ जून रोजी दुपारी ३:१४ वाजता आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये विधान सौधा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत व्हिक्टरी परेड आयोजित करण्यात आल्याची घोषणा केली गेली, तसेच या परेडनंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उत्सव साजरा केला जाईल, असेही सांगण्यात आले. इतकेच नाही तर या पोस्टमध्ये पहिल्यांदाच आणि एकदाच shop.royalchallengers.com वर मोफत पास (मर्यादित प्रवेश) उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. याच्या आधी या पास वाटपाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. म्हणजेच आरसीबीच्या मागील पोस्टनुसार हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.