Karnataka High Court News Today : कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हैसूरमधील लोकप्रिय दसरा उत्सवाच्या उद्घाटनाबाबत उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी दाखल केलेल्या याचिकांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. “दसरा उत्सवाचे प्रमुख अतिथी बानू मुश्ताक असल्या तर काय बिघडलं? हा धर्मनिरपेक्ष देश आहे” अशी टिप्पणी देखील यावेळी न्यायालयाने केली आहे.
जातीय सलोखा मजबूत करण्याच्या उद्देशाने आणि भारताच्या ‘गंगा जमुना तहजीब’चं (हिंदू-मुस्लीम ऐक्य) उदाहरण सादर करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने प्रसिद्ध लेखिका बानू मुश्ताक यांना म्हैसूर दसरा समारंभाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. परंतु, सरकारच्या या आमंत्रणामुळे भारतीय जनता पार्टीसह काही हिंदुत्ववादी संघटना नाराज झाल्या. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला.
“दुसऱ्या धर्माच्या महिलेला अशा धार्मिक कार्यक्रमात बोलावणं उचित नाही, हे हिंदूंच्या अधिकारांचं उल्लंघन आहे” असं या संघटनांचं म्हणणं आहे. या संघटना केवळ विरोध करून स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी थेट कर्नाटक उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं.
न्यायालयाने काय म्हटलं?
हिंदुत्ववादी संघटनांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने म्हटलं आहे की “कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला आमंत्रित करणं हे याचिकाकर्त्याच्या कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचं उल्लंघन नाही. याचिकाकर्त्याच्या दाव्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला कुठलंही कारण दिसत नाही. उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता म्हैसूरमधील लोकप्रिय दसरा समारंभाचं उद्घाटन बानू मुश्ताक यांच्या हस्ते करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
म्हैसूर जिल्हा प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या लोकप्रिय लेखिका बानू मुश्ताक यांना म्हैसूर दसरा समारंभाचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. याबाबतचं वृत्त समोर येताच उजव्या विचारसरणीच्या संघटना, भारतीय जनता पार्टीचे नेते विरोध करू लागले होते. भाजपा नेते म्हणत होते की “आमच्या परंपरा व धार्मिक भावनांविरोधात जाऊन सरकारने बानू मुश्ताक यांची उद्घाटनासाठी निवड केली आहे.”
दरम्यान, बानू मुश्ताक यांचा एक जुना व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये त्यांनी कानडी भाषेची देवी भुवनेश्वरीबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत उजव्या संघटनांनी दावा केला होता की “बानू मुश्ताक यांचं वक्तव्य हे हिंदू संस्कृतिचा अपमान करणारं आहे.”