Kedarnath Helicopter Video: केदारनाथला जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरचे शनिवारी उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर बदासू बेसवरून केदारनाथसाठी उड्डाण केले होते आणि टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सिरसीजवळ महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण थोडक्यात बचावले.
शनिवारी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी येथे महामार्गावर केदारनाथ धामला जाणाऱ्या एका खाजगी हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्यामुळे उत्तराखंडमध्ये एक मोठा अपघात टळला. लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये काही प्रवासी होते. हे सर्व सुरक्षित असले तरी, पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
संबंधित हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहे. सिरसीहून प्रवाशांसह उड्डाण करणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडानंतर खबरदारी म्हणून हेलिपॅडऐवजी महामार्गावर उतरवावे लागले. याबाबत उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये केस्ट्रेल एव्हिएशनचे हेलिकॉप्टर महामार्गाच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या टेल रोटरमुळे एका कारचे नुकसान झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
रुद्रप्रयागचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि हेली सर्व्हिस नोडल अधिकारी राहुल चौबे म्हणाले की, “आज, ७ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास, केस्ट्रेल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये भरासू येथून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते राष्ट्रीय महामार्गावर उतरले. विमानात पाच प्रवासी आणि एक पायलट होते. पायलट जखमी झाला असून, पाचही प्रवासी सुरक्षित आहेत.”
भारतीय वायुसेनेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग
दुसऱ्या एक घटनेत काल, ६ जून रोजी भारतीय वायुसेनेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित उड्डाणादरम्यान तांत्रिक समस्येमुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. यातील पायलट आणि सह-पायलट दोघेही सुरक्षित आहेत.
भारतीय वायुसेनेचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक समस्येमुळे सकाळी ११ वाजता भारतीय वायुसेनेच्या अपाचे हेलिकॉप्टर सहारनपूर येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. लँडिंगनंतर सर्व आवश्यक तपासण्या करून हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या.