Kerala Hijab Controversy : केरळच्या कोची शहरातील एका खासगी शाळेत गेल्या आठवड्यात हिजाबच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आठवीत शिकणारी एक विद्यार्थिनी अचानक शाळेत हिजाब परिधान करून आल्यामुळे शाळेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर शाळेत मोठा तणाव निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला दोन दिवसांची (१३ व १४ ऑक्टोबर) सुट्टी देखील दिली होती.
तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणात आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. शाळेत हिजाब परिधान करण्यास विरोध करण्यात आल्याने आठवीच्या विद्यार्थिनीने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी काय म्हटलं?
“शाळेने तिला हिजाब परिधान करण्यास विरोध केल्याने आम्हाला खूप वाईट वाटलं. आता ती (विद्यार्थिनी) तिथे शिकू इच्छित नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलीने हिजाब घातल्याने इतरांमध्ये भीती निर्माण होईल. यामुळे माझ्या मुलीला खूप दुःख झालं. मी हा जातीय तणावाचे कारण बनू इच्छित नाही. शाळा प्रशासन म्हणतं की त्यांना धर्मनिरपेक्ष ड्रेस कोड लागू करायचा आहे. माझ्या मुलीने घातलेली शाल धर्मनिरपेक्ष नाही का? माझ्या तक्रारीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. पण हे प्रकरण आणखी बिकट होऊ नये असं मला वाटतं”, असं विद्यार्थिनीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
कोचीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर केरळमध्ये पुन्हा हिजाबच्या वादाला तोंड फुटल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. ही घटना पूर्वनियोजित आणि चिंताजनक असल्याचं भाजपाने म्हटलं. कोची शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी अचानक शुक्रवारी हिजाब परिधान करून आल्याने हा वाद निर्माण झाला होता. विशेष बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून ही विद्यार्थिनी नियमितपणे शाळेच्या गणवेशात येत होती. मात्र, गेल्या आठवड्यात तिने हिजाब परिधान करून शाळेत हजेरी लावली. त्यावेळी शाळा प्रशासनाने हे गणवेश धोरणाचे उल्लंघन असल्याचे सांगत विद्यार्थिनीला समज दिली. पण त्यानंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी गोंधळ घातल्याने शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.