दिवंगत खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवाले यांचे जम्मूमधील फलक काढल्यावरून जवळपास दोन हजार शीख युवकांनी केलेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. ‘रास्ता रोको’ मागे घेण्याची विनंती करणाऱ्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने यात दोन पोलीस जखमी झाले.
जर्नलसिंग भिंद्रनवाले यांच्या ३९व्या पुण्यतिथीनिमित्त जम्मूमध्ये शीख समाजाकडून फलक लावण्यात आले होते. हे फलक हटविण्यात आल्याने संतप्त झालेल्या युवकांनी वेगळ्या खलिस्तानचे नारे देत सत्वारी-आर एस पुरा रस्त्यावर आंदोलन करीत वाहतूक अडविली होती. यामुळे पोलिसांना आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार व अश्रुधुरांच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी जम्मू-पठाणकोठ महामार्ग अडवत संपूर्ण वाहतूक ठप्प केली. या वेळीही खलिस्तानचे नारे देण्यात येत होते. या वेळी पोलिसांनी त्यांना रस्ता खुला करण्यास सांगताच आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाले. यामुळे पुन्हा जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. सध्या जम्मूमधील परिस्थिती तणावपूर्ण असून काही विद्रोही घटक समाजाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सत्वारी पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी फलक हटविल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. भिंद्रनवाले याची ६ जूनला पुण्यतिथी असल्याने हे फलक लावण्यात आले होते. या वेळी सत्वारी-आर एस पुरा रस्त्यावर काही कार्यक्रमांचेही आयोजन शीख समाजाकडून करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षकावर जीवघेणा हल्ला
जम्मूमध्ये दिवंगत खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवाले याचे फलक प्रथमच लावण्यात आले होते. ते हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. या वेळी काही शीख युवकांनी धारदार शस्त्राने पोलीस उपनिरीक्षक अरुण कुमार यांच्यावर हल्ला केला होता. या वेळी त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना जीएमसी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
