Kolkata Rape Case: गेल्या काही दिवासांत कोलकात्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आर जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर कोलकातामधील एका लॉ कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता कोलकाता येथील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने बॉइज हॉस्टेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
कोलकाता शहरातील प्रतिष्ठित पदव्युत्तर व्यवस्थापन संस्थेतील एका दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केलं आहे. या विद्यार्थ्याने मुलांच्या वसतिगृहात एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. तो कर्नाटकचा रहिवासी असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने दुसऱ्या संस्थेतील एका विद्यार्थिनी असलेल्या तरुणीला समुपदेशन सत्रासाठी संस्थेच्या कॅम्पसमध्ये बोलावलं होतं. ती आल्यानंतर तो तिला गेटवर भेटला. त्यानंतर तिचे नाव नोंद वहीत न टाकण्यास सांगितलं, असा आरोप तिने केला. त्यामुळे तिच्या मनात काही शंका निर्माण झाली. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. तसेच त्यानंतर मुलांच्या वसतिगृहात त्याचं काही काम असल्याचं सांगून आरोपीने त्या तरुणीला समुपदेशन स्थळाऐवजी वसतिगृहात नेल्ल्याचा आरोप केला आहे.
त्यानंतर तिला पिझ्झा आणि पाणी देण्यात आलं होतं, तसेच त्यामध्ये ड्रग्ज मिसळण्यात आल्याचा दावा देखील संबंधित तरुणीने केला आहे. तिने पोलिसांना सांगितलं की ती बेशुद्ध पडली आणि तिच्यावर बलात्कार झाला. शुद्धीवर आल्यानंतर ती वसतिगृहाच्या खोलीतून पळून गेली आणि तिच्या एका मैत्रिणीला घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांना या प्रकरणात आणखी चार जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. आता पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. सुरक्षा रक्षकाची चौकशी करण्यात आली असली तरी पोलीस सूत्रांनी सांगितलं की ते वसतिगृहाच्या अधीक्षकाची चौकशी करणार आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणार आहेत. पोलिसांनी वसतिगृहाच्या भोवती मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच घटनास्थळावरून फॉरेन्सिक नमुने गोळा केले आहेत आणि संस्थेबाहेर सुरक्षा वाढवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं आहे.