Kolkata Rape Case : कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष हे एका मोठ्या रॅकेटचा भाग होते, याचा पदार्फाश करणे आवश्यक होते असं सीबीआयने विशेष न्यायालयाने सांगितलं. रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. याप्रकरणी संजय घोषला १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली असून याप्रकरणी १२ सीबीआय अधिकारी आणि २५ सीआरपीएफ जवान त्याच्या संरक्षणासाठी उपस्थित होते. परंतु, अशा परिस्थितीतही त्याच्यावर दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संदीप घोष याला आंदोलक महिला वकिलांनी कोर्टरुममध्ये कानाखाली मारली तसंच, बाहेर आंदोलकांनीही त्याच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संदीप घोषला सोमवारी भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली. तसंच, घोषचा सुरक्षा रक्षक अफसर अली खा (४४), आरजी कर रुग्णालयातील एक विक्रेता बिप्लब सिंघा (५२), माँ तारा ट्रेडर्सचा मालक सुमन हाजरा (४६) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनाही १० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.

संदीप घोषविरोधात सीबीआय कार्यालय आणि कोर्टात घोषणाबाजी

सीबीआयचे वकील रामबाबू कनोजिया यांनी न्यायालयाला सांगितलं की हे चारही आरोपी या मोठ्या रॅकेटचा भाग होते. यात आणखी लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे एक मोठं रॅकेट आहे, याची चौकशी करणे आवश्यक आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास संदीप घोष आणि अटकेत असलेल्या इतरजण सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा निझाम पॅलेसमधील सरकारी कार्यालयांचे कर्मचारी आणि खासगी कार्यालयांचे कर्मचारी रस्त्यावर जमा झाले होते. त्यांनी चोर चोर म्हणत पीडितांना न्याय देण्यासाठी घोषणाबाजी केली.

हेही वाचा >> विधेयकाच्या आडून भाजप लक्ष्य, विधानसभेत ममता बॅनर्जी आक्रमक; प. बंगालमध्ये ‘अपराजिता’ कायदा

अलिपूर येथे आंदोलकांचा मोठा जमाव त्यांची वाट पाहत होता. तिथेही त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली. सीबीआयच्या पथकाने त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवून कोर्टरुममध्ये नेले. तसंच, आंदोलकांना बाहेर ठेवण्यासाठी पहिल्या मजल्यावरील कोर्टरुमकडे जाणारा मुख्य दरवाजाही बंद केला गेला.

वकिलांकडून मारहाण

कोर्टरुममध्ये संदीप घोष शिरताच महिला वकिलांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर काहींनी चपलाही भिरकावल्या. या काळात संदीप घोषसह तिघांचेही चेहरे झाकले गेले होते. त्यामुळे वकिलांच्या एका गटाने गोंधळ घालत त्यांचे चेहरे उघडे करण्याची मागणी केली. जवळपास १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर ४. ०५ वाजता न्यायालयीन कामकाज सुरू झाले.

रुग्णालयातील गुन्ह्यांची व्याप्ती मोठी

सीबीआयने चौघांवरही सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेकायदा पैसे घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, फसवणूकविरोधातील कलम ४२०, गुन्हेगारी कट रचने कलम १२०, बनावट दस्ताऐवज बनवणे कलम ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयचे वकील कनोजिया यांनी या गुन्ह्याची मोठी व्याप्ती असल्याचं म्हटलं आहे. तसंच हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचं सांगत आरोपींना १० दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली. आम्हाला आणखी पुरावे गोळा करावे लागतील. तपासादरम्यान आणखी काही गुन्हे समोर येऊ शकतात, असं सीबीआयने न्यायालयात सांगितलं.

जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, संदीप घोषचे वकील झोहेब रौफ यांनी कमी कोठडीची मागणी केली. “संदीप घोषने आतापर्यंत तपासाल सहकार्य केलं असून सोमवारी अटक झाली तेव्हाही तो सीबीआयच्या कार्यालयात गेला होता. प्रत्येक दिवशी त्याला समन्स पाठवण्यात आले होते. तो चौकशीसाठी कायम उपस्थित राहिला आहे. त्याला नजरकैदेत ठेवण्याची विनंती विचारात घ्यावी”, असं रौफ म्हणाले. तसंच इतर तिघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

सुनावणी संपल्यानंतर आंदोलकांकडून मारहाण

सुनावणी संपल्यानंतर त्याला कोर्टातून बाहेर आणण्यात आले. तेव्हाही आंदोलकांनी निदर्शने केली. सुरक्षेकरता आणखी दहा सीआरपीएफ जवान पोलिसांना बोलवावे लागले. संदीप घोष सीबीआयच्या गाडीत बसण्याआधीच आंदोलकाच्या एका गटाने त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला मारहाण केली.

बलात्कार प्रकरणीही चौकशी व्हावी

सीबीआयने त्याला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. परंतु डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणीही त्याची चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.