पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सात दिवस पूर्ण झाले आहेत. २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर धर्म विचारुन गोळीबार केला. काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांना ठार करण्यात आलं. या घटनेच्या वेदना ताज्या असतानाच एक बातमी समोर आली आहे. ही बातमी लक्ष्मी मित्तल यांच्या संदर्भातली असून ती अस्वस्थ करणारी आणि चिड आणणारी आहे.
पाकिस्तानच्या परिषदेचं प्रायोजकत्व लक्ष्मी मित्तल यांच्या संस्थेने घेतल्याची माहिती समोर
काश्मीरच्या मातीत निरपराध भारतीय पर्यटकांचं रक्त सांडलं. या घटनेला सात दिवस उलटले आहेत. मात्र ही वेदना दीर्घकाळ भारतीयांच्या मनात ठसठसत राहिल. मात्र भारतीय पोलाद व्यावसायिक लक्ष्मी मित्तल यांनी पाकिस्तानच्या हार्वर्ड येथे २०२५ मध्ये होणाऱ्या परिषदेचं प्रायोजकत्व घेतलं आहे. हार्वर्ड विद्यापीठातील परिषदेसाठी लक्ष्मी मित्तल अँड फॅमिली साऊथ ईस्ट एशियाने मोठं अर्थसहाय्य करुन पाकिस्तान परिषदेचं प्रायोजकत्व घेतलं आहे. द पाकिस्तान कॉन्फरन्स अॅट हार्वर्ड या वेबसाईटवर द पाकिस्तान कॉन्फरन्स अॅट हार्वर्ड या संस्थेने या संदर्भातली माहिती दिली. अमेरिकेत पाकिस्तानातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातली परिषद आहे. या परिषदेत शिक्षणविषयक धोरण ठरवणारे धोरणकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, व्यावसायिक, नेते अशा सगळ्यांचा सहभाग असणार आहे.
लक्ष्मी मित्तल यांच्यावर सोशल मीडियावरुनही टीका
दरम्यान धक्कादायक बाब ही आहे की या वेबसाईटवर जी प्रायोजक आहेत त्या यादीत लक्ष्मी मित्तल अँड साऊथ ईस्ट एशिया इन्स्टिट्यूट हे नाव आहे. पाकिस्तानी परिषदेला भारतीय उद्योगपतीच्या संस्थेने पाठिंबा देणं म्हणजे तुर्कस्तानातील तुर्कींनी ख्रिसमससाठी मतदान केल्या प्रमाणे आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या कारवाया रोखण्यासाठी उपाय योजते आहे. विविध निर्णय घेतले जात आहेत. पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अशात भारतीय अब्जाधीशाने पाकिस्तानचं प्रायोजकत्व स्वीकारणं हा प्रकारे विश्वासघातच आहे असं म्हटलं जातं आहे. लक्ष्मी मित्तल यांनी पाकिस्तानच्या परिषदेचं प्रायोजकत्व स्वीकारल्याची बाब सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी लक्ष्मी मित्तल यांच्यावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे #BoycottPakistanConference #ShameOnMittal हे हॅशटॅग ट्रेंड झाले आहेत. एक भारतीय व्यावसायिक भारताच्या जखमांकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानचं प्रायोजकत्व कसा घेऊ शकतो? असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. तसंच लक्ष्मी मित्तल यांना ट्रोल केलं जातं आहे. opindia.com ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर संपूर्ण जगातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जातो आहे. २६ पर्यटकांना अतिरेक्यांनी क्रूर पद्धतीने ठार केलं. आता लक्ष्मी मित्तल यांनी पाकिस्तानच्या परिषदेचं प्रायोजकत्व घेतल्याने त्यांच्यावर टीका केली जाते आहे.