Vaishno Devi Landslide : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या वैष्णोदेवी मंदिर तीर्थयात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैष्णोदेवीला जाण्यासाठी काही मार्गावरील रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसेच वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या नवीन ट्रॅकवर सोमवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. त्यामुळे तेथील स्थानिक प्रशासनाने बॅटरी कार सेवा बंद केली आहे.
तसेच जम्मू-काश्मीरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या न्यू हाफलोंग-जटिंगा विभाग रेल्वे ट्रॅकवर भूस्खलन झाल्यामुळे सोमवारी संध्याकाळपासून दक्षिण आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि मिझोरम आणि गुवाहाटी मार्गे देशाच्या उर्वरित भागांमधील रेल्वे सेवा बंद विस्कळीत झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त झी बिझनेसने दिलं आहे.
जम्मूच्या डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रियासीतील कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या हिमकोटी मार्गावर देखील भूस्खलन झालं आहे. त्यानंतर हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. भूस्खलनानंतर तेथे पसरलेला ढिगारा हटवण्यासाठी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने तातडीने त्याठिकाणी पथक पाठवण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, एनएफआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी किशोर शर्मा यांनी सांगितलं की, “न्यू हाफलोंग-जटिंगा लंपूर विभागात रेल्वे ट्रॅकवर दगड आणि जमिनीचा ढिगारा कोसळल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सोमवारी संध्याकाळपासून या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तसेच उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या नौ कांची या ठिकाणी भूस्खलनात एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच आणखी दोन जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी बचाव कार्य सुरू केलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.