तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप झाल्यानंतर आता खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता केवळ खासदारच लोकसभा पोर्टलचा वापर करू शकतील. ते त्यांच्या लॉग इन आयडीसह इतर माहिती कोणाशीही शेअर करू शकत नाहीत. तसेच त्यांना गोपनीयता बाळगण्यास सांगितलं आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांनंतर तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मान्य केलं की त्यांनी लोकसभा पोर्टलचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांना दिला होता. हेच दर्शन हिरानंदानी महुआ मोइत्रा यांच्या वतीने लोकसभेत प्रश्न विचारत होते, असा आरोपदेखील करण्यात आला आहे. याप्रकरणी मोइत्रा यांची चौकशी चालू आहे.

लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कथितरीत्या लाच घेतल्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या संसदेच्या नैतिकता समितीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली आहे. समतीचा अहवाल ६ विरुद्ध ४ मतांनी स्वीकारण्यात आला असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याप्रकरणी निर्णय घेण्यार आहेत. अशातच आता लोकसभेच्या पुढच्या अधिवेशनापूर्वी खासदारांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

खासदारांसाठी जारी करण्यात आलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे

लोकसभा पोर्टलचा वापर केवळ खासदारच करू शकतील.
लोकसभा पोर्टलवरील लॉग इन आयडी आणि पासवर्ड कोणाशीच शेअर करता येणार नाही.
खासदारांनी संसदेची गोपनीयता कायम राखावी.
प्रश्नोत्तरांचं सत्र सुरू होईपर्यंत प्रश्नाची उत्तरं शेअर करू नका.

हे ही वाचा >> भारत-कॅनडा संबंध सुधारले? कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा सुरू केल्यानंतर एस. जयशंकर म्हणाले…

नैतिकता समितीने महुआ मोइत्रांबाबत जाहीर केलेल्या अहवाला काय म्हटलंय?

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाचखोरी आणि लॉग-इन आयडी-पासवर्ड अन्य व्यक्तीला देणे ही दोन्ही कृत्ये अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक आणि गुन्हेगारी स्वरुपाची आहेत, याआधारे मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात यावी. यासंदर्भात विशिष्ट मुदतीत केंद्र सरकारने अधिक चौकशी करावी.