London Mass Stabbing in Moving Train : लंडनला जाणाऱ्या एका धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांवर चाकूहल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या १० जखमींपैकी नऊ जणांची प्रकृती नाजूक आहे. दरम्यान, ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी या घटनेनंतर दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. डॉनकास्टरवरून लंडन किंग्स क्रॉसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे.

ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी या घटनेबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे.पोलिसांनी म्हटलं आहे की “आम्ही किंग्स क्रॉस स्टेशनला जाणाऱ्या ट्रेनमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी कारवाई करत आहोत. या ट्रेनमधील काही प्रवाशांवर चाकूहल्ला झाला आहे. आम्ही याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करत आहोत.”

ट्रान्सपोर्ट पोलिसांनी पुष्टी केली आहे की ट्रेन उत्तर-पूर्व डॉनकास्टरवरून लंडनच्या किंग्स क्रॉस स्टेशनला जात होती. या मार्गावर बरीच गर्दी असते. गर्दीच्या वेळीच ही घटना घडली आहे.”

ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?

एका प्रत्यक्षदर्शीने द टाइम्स या वृत्तपत्राला या घटनेची माहिती देताना सांगितलं की त्याने एका व्यक्तीला मोठ्या चाकूसह ट्रेनमध्ये पाहिलं. सगळीकडे केवळ रक्त दिसत होतं. अनेक प्रवासी सैरावैरा धावत होते. धावताना काही प्रवासी पडले. तसेच इतर प्रवासी पडलेल्यांना चिरडून जीव मुठीत धरून पळत होते.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला सांगितलं की ट्रेन थांबली तेव्हा आम्ही ही घटना पाहिली. एक व्यक्ती मोठा चाकू घेऊन जात असताना आम्ही पाहिलं. तो जात असताना पोलिसांनी त्याला खाली पाडलं आणि बेड्या ठोकून पोलीस व्हॅनमध्ये नेलं. तसेच ट्रेनच्या ज्या डब्यातून तो इसम उतरला होता त्या डब्यात सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला दिसत होता.

ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेप्रकरणी संवेदना व्यक्त करत ते म्हणाले, “ही भयावह व चिंताजनक घटना आहे. मी या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांबरोबर आहे. आपत्कालीन सेवा व पोलिसांनी तातडीने दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. घटना घडली त्या परिसरातील लोकांनी पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं.