Madhya Pradesh 6 Children Die Due to Cough Syrups : मध्य प्रदेशमधील छिंदवाडामध्ये २२ दिवसांमध्ये ६ मुलांचा आणि राजस्थानमधील एका मुलाचा मृत्यू झाला असून या वृत्तामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. या सातही मुलांच्या मृत्यूचं कारण सारखंच असल्यामुळे सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहात आहे. या प्रकरणाविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की या सर्व मुलांची किडनी निकामी झाली होती.

दरम्यान, काही आरोग्य तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला आहे की ठराविक कंपन्यांकडून विक्री होत असलेल्या खोकल्यावरील औषधामुळे असं झालेलं असावं. कारण ही मुलं सुरुवातीला सर्दी, खोकला, तापामुळे औषधोपचार घेत होती. खोकल्यावरील औषधामुळे ही मुलं दगावल्याचं वृत्त मध्य प्रदेश सरकारने फेटाळलं आहे. ही अफवा निराधार असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

सरकार अ‍ॅक्शन मोडवर

एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितलं की ४ ते २६ सप्टेंबरदरम्यान छिंदवाडामध्ये किडनी निकामी झाल्यामुळे सहा मुलं दगावली आहेत. पीडित कुटुंबांचं म्हणणं आहे की या मुलांना सुरुवातीला सर्दी, खोकला आणि ताप होता. नंतर त्यांची किडनी निकामी झाली.

छिंदवाडाचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. नरेश गुन्नाडे म्हणाले, “या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची पथकं बोलावण्यात आली आहेत. मृत्यू झालेल्या मुलांपैकी तिघांवर उपचार चालू असताना तातडीने नागपूरला नेलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र, उपचारांदरम्यान ही मुलं दगावली. ही मुलं जे पाणी पित होती, जी औषधं घेत होती त्यांचे नमुने व इतर काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आम्ही सध्या या नमुन्यांचा अहवाल येण्याची वाट पाहात आहोत.

‘त्या’ औषधांवर बंदी

डॉ. गुन्नाडे यांनी सांगितलं की “मृत मुलांच्या घरात खोकल्यावरील काही औषधं मिळाली आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून या औषधांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. या औषधांची विक्री थांबवण्यात आली आहे. सध्या पाच मुलं नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून उपचार घेत आहेत.”