‘महाराष्ट्र सदना’च्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रपतींचे प्रशंसोद्गार
महाराष्ट्राने नेहमीच प्रथम देशाचा विचार केला आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र सदना’चे उद्घाटन करताना महाराष्ट्राचा सन्मान केला.
१९९३ मधल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर किंवा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीशी मुंबईकरांनी ज्या पद्धतीने सामना केला त्याबद्दल मुंबईकरांना सलामच करावा लागेल, असेही राष्ट्रपती म्हणाले.
या महाराष्ट्र सदनाचे कौतुक करताना राष्ट्रपती म्हणाले की, देशाच्या राजधानीतील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचेच मुख्यालय सर्वात मोठे आहे. ते नुसतेच मोठे नाही तर अद्ययावतसुद्धा आहे आणि सवरेत्कृष्ट बांधकामाचा नमुनाही आहे, असेही राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले. या वास्तूच्या बांधकामातून महाराष्ट्राच्या शिल्पकलेचा, वास्तूकलेचा आणि संस्कृतीचा प्रत्यय येतो. १३८ खोल्या असलेल्या या सदनात एक भव्य कलादालन, व्हिडीओद्वारे संभाषणाची सोय  तसेच पाच परिषद कक्ष व एक वार्तालाप कक्ष आहे.
देशाच्या अन्य राज्यांमध्ये जुने वाडे, राजवाडे उभे आहेत. पण महाराष्ट्रात अशी कोणतीही वास्तू नाही, याबाबत खंत व्यक्त करून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांचा जास्त वेळ संघर्षांत जातो, याकडे लक्ष वेधले. या पाश्र्वभूमीवर दिल्लीत उभारण्यात आलेली वास्तू महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी ठरेल, असेही पवार म्हणाले.
या कार्यक्रमास राज्यपाल के. शंकरनारायण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे उपस्थित होते.  संपूर्णपणे खासगीकरणाच्या माध्यमातून ही वास्तू उभारण्यात आली असून सरकारी तिजोरीवर बांधकाम खर्चाचा कोणताही भार पडलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम टीका नंतर कौतुकाची फुले
महाराष्ट्र सदनाच्या बांधकामावरून सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य झाले होते. मात्र मंगळवारी या दिमाखदार वास्तूच्या उद्घाटन सोहोळ्यामध्ये आतापर्यंत या प्रकल्पाबाबत आक्षेप घेणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या साऱ्यांनीच ‘भुजबळांमुळे हा प्रकल्प पूर्ण झाला’ असे प्रशंसोद्गार काढले. राष्ट्रपतींनीही भुजबळ यांची या वेळी प्रशंसा केली.

इथे सुद्धा ‘भार नियमन’!
महाराष्ट्र सदनाच्या दिमाखदार सोहोळ्यात  वीज गायब होण्याचा प्रकार एकदा नव्हे तीन वेळा घडला. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत असताना काही सेकंद वीज गेली होती. त्याचा उल्लेख करून शिंदे यांनी ‘मी ऊर्जामंत्री असताना बोलायला उठलो की वीज जायची,’ अशी आठवण करून दिली. शरद पवार यांच्या भाषणातही वीज गायब झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भाषणाला उभे राहिले आणि सभागृहातील वीज पुन्हा गेली. पाच मिनिटे राष्ट्रपती भाषणासाठी काळोखातच उभे होते. अखेर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूच्या खुर्चीत बसवले. नंतर त्यांच्या भाषणामध्ये वीज जाण्याचा प्रकार घडला नाही. सभागृहामधील वीज पुरवठय़ामध्ये असलेल्या तांत्रिक दोषामुळे हे घडल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra always considered country first president mukharjee