आयआरसीटीसीच्या मनमानी कारभारामुळे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे. कॅन्टीनचालक हॉटेल स्नेहाच्या व्यवस्थापनाने तोटय़ामुळे कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून खाद्यपदार्थाचे वाढीव दर आयआरसीटीसीने निश्चित केले होते. ज्यात चहापासून साऱ्या खाद्यपदार्थाचे दर वाढविण्यात आलेत. वाढीव दरामुळे केवळ आयआरसीटीसीला लाभ होतो व ग्राहकांना भरुदड सोसावा लागतो. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तोटय़ात सेवा पुरवणाऱ्या हॉटेल स्नेहाच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी सायंकाळपासून कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसी व राज्य प्रशासनास कळवला.
राज्य शासनाने खान-पान सेवा पुरवण्यासाठी (सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर) आयआरसीटीसीला कंत्राट दिले. आयआरसीटीसीने ३३ टक्के नफ्यावर हे कंत्राट पुण्याच्या स्नेहा हॉटेलला दिले.  स्नेहा हॉटेल व आयआरसीटीसीचा करार १५ फेब्रुवारीला संपला आहे. मात्र आयआरसीटीसी व सदनातील अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने सेवा देणे सुरूच ठेवले. १ मार्चपासून सुधारित दर लागू झाल्यानंतर मात्र हॉटेल व्यवस्थापनाने कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी निवासी आयुक्त विपिन मलिक यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणून पदार्थ महाग होतात..
कॅन्टीनमध्ये मिळणारी पाण्याची बॉटल ‘रेल नीर’ आयआरसीटीसी स्नेहा हॉटेलला विकत देते. त्यावर सेवा कर आकारते. त्यानंतर हेच पाणी स्नेहा हॉटेलच्या माध्यमातून ग्राहकांना विकले जाते. त्यावर पुन्हा सेवा कर आकारण्यात येतो. ग्राहकांकडून येणारे बिल थेट आयआरसीटीसीकडे जमा होते. एकाच पाण्याच्या बॉटलवर दोनदा वसूल करण्यात येणारा सेवा कर थेट आयआरसीटीसीच्या खात्यात जातो. एकूण बिलापैकी ३३ टक्के कपात करून उर्वरित रक्कम स्नेहा हॉटेलला दिली जाते. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे साधा पदार्थदेखील महाग होतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bhavan canteen closed due irctc mismanagement