ठाणे : महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तथाकथित साधू कालिचरण महाराज याला ठाणे पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सकाळी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, कालिचरण याच्या समर्थनार्थ बजरंग दलचे कार्यकर्ते न्यायालयाबाहेर जमले होते. कालिचरण महाराज याला पोलिसांच्या वाहनातून न्यायालयाबाहेर आणले असता त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

महात्मा गांधी यांच्याविरोधात कालिचरण याने आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यातही गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेद्र आव्हाड यांनी २९ डिसेंबर २०२१ ला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर वर्धा पोलिसांनी कालिचरणला अटक केली होती. तेथील न्यायालयाने कालिचरणला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी रायपूर येथील कारागृहात झाली होती.

कालिचरणचा ताबा मिळविण्यासाठी नौपाडा पोलिसांनी रायपूर येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार गुरुवारी नौपाडा पोलिसांना कालिचरण याचा ताबा मिळाला. गुरुवारी रात्री उशीरा त्याला ठाण्यात आणण्यात आले.