Mamta Kulkarni Video : ९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री आणि आता साध्वी बनलेल्या ममता कुलकर्णी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे गेलेल्या ममता कुलकर्णी यांनी अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत स्पष्टीकरण देत असताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे नवा वाद पेटला आहे. यामध्ये त्यांनी थेट दाऊद इब्राहिम याला क्लीन चीट दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ममता कुलकर्णी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
ममता कुलकर्णी यांनी जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा त्या त्यांचे बोल्ड रोल्स आणि स्क्रीन प्रजेंसने चाहत्यांची मने जिंकली होती. मात्र नंतर अंडरवर्ल्डशी संबंध आणि एका ड्रग्ज प्रकरणात संबंध आढळून आल्यानंतर त्यांचे करिअर जवळपास संपुष्टात आले. असेही सांगितले जात होते की अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्याशी त्यांचे कथित संबंध होते.
ममता कुलकर्णी यांचे विधान काय?
या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ममता कुलकर्णी माध्यमांशी बोलताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, “दाऊदचे काय देणेघेणे आहे? माझा दाऊदशी दूरदूपर्यंत काही संबंध नाही. कोणी तरी एकाचे नाव नक्की होते, पण जर तुम्ही पाहिले, तर त्याने बॉम्ब ब्लास्ट किंवा देशविरोधी गोष्टी देशात केल्या नाव्हत्या. मी त्याच्या बरोबर तर नाही, पण तो काही दहशतवादी नाही. तुम्हाला त्यामधील फरक देखील लक्षात आला पाहिजे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “जेव्हा तुम्ही जेव्हा दाऊदचे नाव घेता, ज्याबरोबर माझे नाव जोडले गेले आहे, त्याने कधी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट केले नाहीत… तुम्ही कधी ऐकले का? ज्याचे नाव तुम्ही घेत आहात, त्या दाऊदचे नाव कधीच नव्हते, दाऊदला मी आयुष्यात कधीही भेटले नाही,” असे ममता कुलकर्णी या व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.
२५ वर्षांनंतर भारतात
बॉलीवूड सोडल्यानंतर त्या दुबईला निघून गेल्या होत्या. त्या गेल्या वर्षी तब्बल २५ वर्षानंतर भारतात परतल्या आहेत. येथे आल्यानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडून सन्यास स्वीकारला . त्यानंतर महाकुंभ मेळ्यात किन्नर अखाड्यात दीक्षा घेतली आणि संन्यासी बनल्या. पुन्हा त्यांना महामंडलेश्वर बनवण्यात आले, त्यानंतर मोठा वाद झाला आणि ममता कुलकर्णी यांनी महामंडलेश्वर पद सोडून दिले.
