बसमध्ये कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. जो जो बसने प्रवास करतो, त्याच्यासोबत कधी ना कधी असा वादाचा प्रसंग घडला असेल. असे वाद झाल्यानंतर शक्यतो प्रवाशी वाद आटोपता घेतात. काहीजण वरचे सुट्टे पैसे सोडून देतात. दुकानात देखील खरेदी दरम्यान सुट्टे पैसे नसले की दुकानदार आपल्याला नको असलेले चॉकलेट जबरदस्ती गळ्यात मारतो. बंगळुरुमध्ये एका बसमध्ये सुट्ट्या पैशांवरुन असाच एक वाद झाला. पण प्रवाशी इतका चिवट निघाला की, त्याने थेट ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने देखील या प्रवाशाची मागणी ऐकून घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे सदर प्रवाशाला एक रुपयांच्या बदल्यात हजारो रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे वाचा >> CCTV Video: तीन भटके कुत्रे, चार वर्षांचा लहान मुलगा; भररस्त्यात कुत्र्यांनी लचके तोडल्यानंतर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

घटना कधीची आणि कशी घडली?

२०१९ साली रमेश नाइक हे बीएमटीसी (Bangalore Metropolitan Transport Corporation) च्या बसने प्रवास करत होते. शांतीनगर ते मॅजेस्टीक बस डेपोपर्यंत जाण्यासाठी नाइक यांनी तिकीट काढले. तिकीटाचा दर २९ रुपये एवढा होता. नाइक यांनी कंडक्टरला तीन रुपये दिले. मात्र वरचा एक रुपया कंडक्टरकडून नाइक यांना मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नाइक यांनी थेट जिल्हा ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

ग्राहक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. नाइक यांनी एक रुपयाच्या बदल्यात १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, बीएमटीसीने नाइक यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारदाराचे कायदेशीर प्रक्रीयेसाठी खर्च झालेले १ हजार रुपयेही देण्यात यावेत. यामुळे नाइक यांना एक रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

हे पाहा >> Photos: डबल डेकर AC बस आजपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू, पाहा काय आहे खास? 

एवढेच नाही तर न्यायालयाने कंडक्टर आणि बीएमटीसीच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. एक रुपया परत मागितला म्हणून बस कंडक्टरने मुजोरी दाखवत रमेश नाइक यांच्यासोबत गैरवर्तन केले. त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलले गेले. जेव्हा नाइक यांनी बीएमटीसीच्या उच्च अधिकाऱ्यांना जाऊन याबाबतची तक्रार दिली, तेव्हा देखील कर्मचाऱ्यांनी एक रुपया परत केला नाही. त्यामुळेच तक्रारदाराला जिल्हा ग्राहक न्यायालयात यावे लागले. बीएमटीसीने प्रतिज्ञापत्र दाखल करुन हा क्षुल्लक वाद असल्याचे म्हणत, सेवेतील कमतरतेचा आरोप फेटाळून लावला. तसेच ही तक्रार बेदखल करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ग्राहक रमेश नाइक यांच्याबाजूने निकाल देत त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा >> पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे

तुम्हीही जाऊ शकता ग्राहक न्यायालयात

बस असो किंवा दुकान. अनेकवेळाला ९९ रुपये किंवा ९९ ने शेवट होणाऱ्या वस्तूंच्या किमतीमुळे आपण वरचा एक रुपया सोडून देतो. कधी कधी दुकानदार एक रुपया न देता एखादं चॉकलेट आपल्याला देतो. आपण एक रुपया खूप छोटी रक्कम असल्यामुळे कटकट न करता निघून जातो. मात्र दुकानदाराचा यामध्ये मोठा फायदा असतो. दिवसाला एक हजार ग्राहकांनी एक रुपया सोडला तर त्याचा एक हजाराचा नफा होतो.

जर तुम्हाला एक रुपया देण्यास दुकानदाराने नकार दिला तर तुम्ही jagograhakjago.gov.in किंवा consumerhelpline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदवू शकता. तसेच 1800-11-4000 या टोल फ्री नंबरवर फोन करु शकता. एक रुपया ही छोटी रक्कम असली तरी ग्राहक न्यायालयाला याची दखल घ्यावी लागते.

बंगळुरुच्या प्रकरणात रमेश नाइक यांना दोन हजारांची नुकसान भरपाई तर मिळाली आहेच. पण तक्रार दाखल करण्यासाठी आणि खेटे घालण्यासाठी त्यांना जो मनस्ताप झाला, त्याबद्दल देखील वर एक हजार रुपये त्यांना देण्यात आले. हे देखील महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man goes consumer court for not getting one rupees change back in bmtc bus gets compensation kvg