भारतात वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना पाहाता अजूनही जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाचं उच्चाटन झालं नसल्याचं चित्र दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कर्नाटकच्या कोलारमधल्या बोदागुरकी गावात मंगळवारी ही घटना घडली. मुलीचं कथित खालच्या म्हटल्या जाणाऱ्या जातीच्या मुलावर प्रेम असल्याचं समजल्यानंतर मुलीच्या कुटुंबात मोठा वाद झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी या मुलीची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. हे समजताच मुलानंही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

२० वर्षांची किर्ती पदवीचं शिक्षण घेत होती. किर्तीचं त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या २३ वर्षीय गंगाधरवर प्रेम होतं. पण गंगाधर खालच्या म्हटल्या जाणाऱ्या जातीचा असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना ही बाब पसंत नव्हती. यावरून सोमवारी संध्याकाळी किर्तीच्या घरी मोठा वाद झाला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान किर्तीची श्वास कोंडून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली. ही हत्या किर्तीच्या वडिलांनीच तिची हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वडिलांचा होता विरोध

दरम्यान, मुलीच्या आंतरजातीय आणि त्यातही खालच्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंधांना कृष्णमूर्तीचा विरोध होता. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या विरोधानंतरही कृष्णमूर्ती किर्तीचं गंगाधरशी लग्न लावून देण्यास तयारही झाला होता. मात्र, सोमवारी संध्याकाळी किर्तीच्या या प्रेमसंबंधांमुळे घरात मोठा वाद झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किर्तीची हत्या झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णमूर्तीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

गंगाधरची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधरला किर्तीच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर त्यानं तिच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला धीर देण्यासाठी बाईकवरून बाहेर घेऊन जात असताना त्यानं मध्येच रस्त्यात भावाला बाईक थांबवायला सांगितली. खाली उतरताच गंगाधरनं बाजूच्या रेल्वे ट्रॅकवरून वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर उडी मारून त्यानं आत्महत्या केली. या प्रकरणी कामसमुद्र पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.