UP Crime Man Killed Wife: उत्तर प्रदेशच्या बाहरीच भागात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका ४८ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या करून घरातच आपल्या गादीखाली जमिनीत मृतदेह पुरून ठेवला. तब्बल १२ दिवस कुणालाही कानोकान खबर न लागता पती रोज पलंगावर झोपत राहिला. पण अखेर हा सगळा प्रकार उघड झाला. अटक होण्याच्या भीतीनं पतीनं पोबारा केला खरा, पण पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला शेवटी अटक केली. या प्रकारामुळे बाहरीच परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहरीच भागात आरोपी हरीकिशन ४५ वर्षीय पत्नी फूलादेवी यांच्यासह वास्तव्य करत होता. हरीकिशन हा रोजंदारीवर काम करणारा कामगार आहे. १० ऑक्टोबरपासून फूलादेवी बेपत्ता झाल्या होत्या. आसपास राहणाऱ्या लोकांनी चौकशी केली असता हरीकिशननं फूलादेवी त्याला न सांगता कुठेतरी निघून गेल्याचं सांगितलं. पण फूलादेवी यांच्या भावाला या सगळ्या प्रकरणात संशय आला. आपल्या शंकेची खात्री करण्यासाठी फूलादेवी यांचे भाऊ रामधीरज व इतर नातेवाईक हरीकिशनच्या घरी पोहोचले.

घरी पोहोचल्यावर हरीकिशननं त्यांनादेखील तीच कहाणी सांगितली. फूलादेवी कुणालाही न सांगता अशाप्रकारे गायब झाल्याच्या कथनावर त्यांच्या भावाचा मुळीच विश्वास बसला नाही. त्यांनी संशयातून घरात इतरत्र पाहणी केली असता गादीच्या खाली त्यांना काही दिवसांपूर्वीच सारवलेला एक मोठा भाग दिसला. त्या भागाला काही तडेदेखील गेले होते. यातून त्यांचा संशय बळावला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं.

पोलिसांनी तपास केला आणि धक्कादायक वास्तव समोर आलं!

दरम्यान, पोलिसांनी हरीकिशनच्या घरी दाखल होत गादीखालच्या संबंधित भागाची पाहणी केली आणि तिथे खोदण्याचा निर्णय घेतला. खोदायला सुरुवात केल्यानंतर आधी पोलिसांना तिथे फुटलेल्या बांगड्या सापडल्या. मग पायातलं चांदीचं पैंजण सापडलं. आणखी खणल्यावर काही फाटलेले कपडेदेखील आढळले. काही फूट खणल्यानंतर शेवटी पोलिसांना फूलादेवी यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पण हा सगळा प्रकार घडेपर्यंत हरीकिशन तिथे थांबलाच नाही. आपल्या घरावर पोलिसांच्या पडलेल्या छाप्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत हरीकिशननं तिथून पळ काढला. पोलिसांनी आसपास केलेल्या तपासात हरीकिशन प्रचंड संतापी वृत्तीचा असल्याचं त्यांना समजलं. गेल्या काही महिन्यांमध्ये फूलादेवी व हरीकिशन यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणावर वाढले होते. हरीकिशन वारंवार पूलादेवी यांना मारहाणदेखील करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून हत्या?

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तापासातून हरीकिशन याला फूलादेवी यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता अशी माहिती समोर आली. याच संशयातून त्यांच्यात वारंवार भांडणं व मारहाण होत असल्याचंही पोलिसांना समजलं. हरीकिशनचा ठावठिकाणा शोधण्याच्या प्रयत्नांना २ दिवसांत यश आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी हरीकिशनला बाराबंकी परिसरातून अटक केली.

या प्रकरणात हरीकिशनविरोधात हत्या व पुरावे नष्ट करण्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, प्रथमदर्शनी विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हरीकिशननं पत्नी फूलादेवी यांची हत्या केल्याचं दिसत असल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.