उत्तर प्रदेशच्या झाशीमधील शिव परिवार कॉलनीमधील एका विवाहित महिलेचा सोमवारी संशयास्पदरितीने मृत्यू झाला. महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप केला. मात्र सासरच्या लोकांनी ही आत्महत्या असल्याचा बनाव केला. पण या महिलेच्या पाच वर्षांच्या मुलीने वहीत रेखाटलेले एक चित्र महत्त्वाचा पुरावा ठरले असून यातून सदर खुनाचा उलगडा झाला. २७ वर्षीय सुनेचा हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करून खुन केल्याचे प्रकरण यानिमित्ताने समोर आले. लोकांना ही आत्महत्या वाटावी, म्हणून सदर महिलेचे शव दोरीला लटकविण्यात आले. झाशीमधील कोतवाली परिसर येथे असलेल्या पंचवटी शिव परिवार कॉलनीमध्ये मृत सोनाली बुधोलिया आणि त्यांचे पती संदीप बुधोलिया हे पाच वर्षांची मुलगी दर्शिताबरोबर राहत होते. दोघेही पती-पत्नी वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.
वीस लाख हुंडा दिला तरी…
सोनाली यांचे वडील संजीव त्रिपाठी मध्ये प्रदेशमध्ये राहतात. ते म्हणाले, २०१९ साली माझ्या मुलीचे लग्न झाले. तेव्हापासून दोघांच्याही नात्यात तणाव होता. लग्नाच्या दिवशी आम्ही मुलाकडच्या मंडळींना २० लाख रुपयांचा हुंडा दिला होता. पण त्यानंतरही संदीप आणि त्याचा परिवार नवनव्या मागण्या करत राहिला. त्यांना नवी चारचकी हवी होती. मी त्यांना सांगितले की, हे माझ्या ऐपतीबाहेरचे आहे. तरीही त्यांनी माझे न ऐकता माझ्या मुलीला त्रास देण्यास सुरूवात केली. यावरून मी एकदा पोलिसांत तक्रार दिली होती, त्यानंतर आमच्यात समेट घडवून आणण्यात आला होता.
संजीव त्रिपाठी पुढे म्हणाले, सोनालीने मुलीला जन्म दिल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली. संदीपला मुलगा हवा होता. प्रसूतीनंतर संदीप आणि त्याचे कुटुंबिय माझ्या मुलीला रुग्णालयात सोडून निघून गेले. मी नर्सिंग होममध्ये जाऊन बिल भरले आणि दोघींनाही घरी घेऊन आला. त्यानंतर महिन्याभराने संदीप सोनाली आणि दर्शिताला घेऊन गेले.
सोमवारी सकाळी मला फोन आला. सोनालीची प्रकृती खालावली असल्याचे संदीपच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यानंतर मला पुन्हा आला आणि सोनालीने गळफास घेतल्याचे ते म्हणाले. मी तिथे पोहोचेपर्यंत सोनालीचा मृत्यू झाला होता. कोतवाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी रामवीर सिंह म्हणाले की, आम्ही महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तापसणीसाठी पाठवला आहे. मुलीच्या पालकांनी खुनाच संशय व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे आम्ही सासरच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले आहे.
मुलीच्या चित्रामुळे रहस्य उलगडले
दरम्यान पाच वर्षांच्या दर्शिताने आपल्या वहीत काढलेले चित्र लक्षवेधी ठरत आहे. दर्शिताने सांगितले की, बाबा आईला नेहमी मारत असत. तू मरत का नाहीस? असेही ते तिला विचारायचे. बाबांनीच आईचे शरीर दोरीला लटकविले आणि नंतर त्यावर दगड मारला. त्यानंतर तिला पुन्हा खाली उतरवून गोणीत भरले. वडिलांनी मलाही मारण्याची धमकी दिली होती. असेही भेदरलेल्या चिमुकलीने पोलिसांना सांगितले.
© IE Online Media Services (P) Ltd