नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची आठवण व्हावी, असे दिल्लीत घडलेले अन्य एक हत्या प्रकरण उघडकीस आले. दिल्लीतील पांडवनगरमध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी त्याचे दहा तुकडे करून ‘फ्रीज’मध्ये ठेवले.  ते पूर्व दिल्ली भागात ते फेकून दिले, असा दावा दिल्ली पोलिसांनी सोमवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंजन दास (४५ वर्षे) याची ३० मे रोजी हत्या करण्यात आली. त्याचा खून  पत्नी पूनम (४८) व सावत्र मुलगा दीपक (२५) यांनी केला. अंजन दासच्या मृतदेहाचे काही अवशेष एका पिशवीत भरलेले सापडले. ही पिशवी पूर्व दिल्लीतील कल्याणपुरी येथे ५ जून रोजी सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी अंजन दासच्या पाय, मांडय़ा, कवटी आणि हाताचे अवशेष सापडल्यांतर पोलिसांनी पांडवनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

मृत अंजन दासचा विवाह पूर्वी झाला होता. त्याची आधीची पत्नी व आठ मुलांचे कुटुंब बिहारमध्ये राहते, ही बाब त्याने पूनमपासून लपवली होती. दास याची ओळख पटवण्यासाठी त्याच्या मुलांचे ‘डीएनए’ नमुने घेण्यासाठी पोलीस पथक बिहारमध्ये जाणार आहेत. अंजन दासची आपली सावत्र मुलगी आणि सावत्र मुलाच्या सुनेवर वाईट नजर असल्याच्या संशयातून पूनम व दीपकने अंजनची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी हत्येनंतर तीन-चार दिवसांनी दिल्लीच्या पूर्व भागात ठिकठिकाणी त्याचे अवयव फेकले व त्याची कवटी पुरली. अंजनच्या पेयामध्ये झोपेच्या गोळय़ा टाकून तो बेशुद्ध झाल्यावर  त्याचा गळा चिरला, असा पोलिसांचा दावा आहे.

परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाचे विश्लेषण आणि घरोघरी तपास केल्यानंतर हा मृतदेह अंजन दास यांचा असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पूनम व दीपकची चौकशी केली. या दोघांनीही अंजन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी विसंगत माहिती दिली. त्यानंतर अंजनचा खून झाल्याचीआरोपींनी कबुली दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man s body chopped into pieces and stored in fridge by wife in delhi zws