महत्त्वाच्या मुद्दय़ांवर मौन धारण केल्याची टीका होत असताना पंतप्रधान मनमोहन सिंग आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत. धोरणनिश्चितीबाबत सातत्याने होणारी टीका, राजकारण, भ्रष्टाचार, वाढती महागाई, अर्थव्यवस्थेची वाटचाल आदी सर्व प्रश्नांवर पंतप्रधान मनमोहन सिंग आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत सविस्तर उत्तरे देणार आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या कारकिर्दीतील पंतप्रधानांची ही दुसरी सार्वजनिक पत्रकार परिषद असेल, हे विशेष.
जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पंतप्रधान राजीनामा देणार असल्याचे खोडसाळ वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा पंतप्रधान कार्यालयाकडून तातडीने इन्कारही करण्यात आला होता. तरीही याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व चर्चाना पूर्णविराम देण्याबरोबरच भ्रष्टाचार, अर्थव्यस्था, धोरणलकवा आदी मुद्दय़ांवर पंतप्रधान शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. तसेच केंद्र सरकारने आतापर्यंत घेतलेले निर्णय, त्यांची पूर्तता किती झाली याचा आढावा, परराष्ट्र धोरण आदी मुद्दय़ांबाबतही पंतप्रधान प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh to address media today