मोदी सरकारमधील वाचाळ मंत्र्यांच्या यादीत आता लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भर पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मनोहर पर्रिकर यांची प्रतिमा अभ्यासू आणि संयत राजकारणी अशी होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या विधानांमुळे ही प्रतिमा डागाळण्यास सुरूवात झाली आहे. नुकत्याच गोव्यात झालेल्या एका सभेत पर्रिकर यांची जीभ चांगलीच घसरली. यावेळी पर्रिकर यांनी त्यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या गोव्यातील प्रसारमाध्यमांच्या गटाला ‘विवस्त्र व्हा आणि नाचा’ असा वादग्रस्त सल्ला दिला. उत्तर गोव्यातील सत्तारी येथे झालेल्या सभेत एकमेकांवर टीका करताना कोणत्या मर्यादा पाळाव्यात या विषयावर बोलताना पर्रिकर यांनी हे वादग्रस्त विधान केले. पर्रिकर म्हणाले की, मला अजूनही लक्षात आहे, १९६८ मध्ये वॉटरगेट प्रकरणावर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सल्ला देताना एका मराठी संपादकाने भलामोठा अग्रलेख लिहिला. आता अग्रलेख मराठीत असल्याने तो निक्सन यांच्यापर्यंत कसा पोहोचणार? निक्सन तर अमेरिकेत होते. पर्रिकर यांनी दिलेल्या या दाखल्याचा रोख गोव्यातील प्रादेशिक भाषेच्या एका संपादकाकडे होता. काहींना त्यांच्या मर्यादा माहित नसतात. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्यासाठी माझ्याकडे काही चांगले सल्ले आहेत. विवस्त्र व्हा आणि नाचा. आणखी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवता येत, असे पर्रिकर यांनी या संपादकांना उद्देशून म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्धी मिळवण्यासाठी मीडियाचा दुरुपयोग करणाऱ्यांना मी एक सल्ला देतो. इथून एक वृत्तपत्र प्रकाशित होत असे, आताही होतं. मी त्याचं नाव घेणार नाही. त्याचे एक संपादक आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपादक होते. वृद्धापकाळात त्यांना इथे आणण्यात आले. त्यांच्या वृत्तपत्राच्या केवळ एक हजार प्रतींची विक्री होत असे, असेही पर्रिकर यांनी म्हटले.

यापूर्वी शिवसेनेनेही मनोहर पर्रिकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे पण जास्तीत जास्त कृती शांतपणे करावी, या संकेताची आठवणही सेनेकडून पर्रीकरांना करून देण्यात आली होती. संरक्षणमंत्री मनोहरपंत पर्रीकर हे गोव्यातील अनेक मतदारसंघांत जोरदार भाषणे करीत आहेत. त्यांच्या भाषणांत गोमंतक कमी आणि पाकिस्तान जास्त आहे. दिल्लीत किंवा हिंदुस्थानच्या सीमेवर द्यायला हवीत अशी वीरश्रीयुक्त भाषणे पर्रीकर हे गोव्यातील म्हापसा, पेडणे, पणजी, सावर्डे, फोंडा अशा ठिकाणी देत आहेत. हे म्हणजे सशाची शिकार करायला जाताना वाघाला मारायला चाललोय असा आव आणण्यासारखे आहे. मनोहर पर्रीकरांना हे बाळकडू पुरेपूर मिळाले आहे, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manohar parrikar has a advice for goan media critics take off clothes and dance naked