पीटीआय, नवी दिल्ली

भाजीपाला, तृणधान्य किमती घसरल्यामुळे सरलेल्या मे महिन्यात किरकोळ महागाई दर २५ महिन्यांच्या नीचांकी ४.२५ टक्क्यांवर नोंदवला गेला. महागाई दरात घसरणीचा हा क्रम सलग चौथ्या महिन्यात कायम असून, रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील मर्यादा पातळी अर्थात सहा टक्क्यांखाली तो नोंदवला जाण्याचा हा सलग तिसरा महिना आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या एप्रिल महिन्यात ४.७ टक्के पातळीवर होता, तर गेल्या वर्षी म्हणजे मे २०२२ मध्ये तो ७.०४ टक्के अशा चिंताजनक पातळीवर होता. एप्रिल २०२१ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४.२३ टक्क्यांच्या महागाई दरानंतर नोंदवला गेलेला सर्वात कमी दर आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये महागाई दर ४ टक्क्यांच्या पातळीखाली नोंदवला गेला होता.

अन्नधान्य घटकाच्या किमती घट झाल्याचा परिणाम मे महिन्याच्या एकंदर महागाई दरातील घसरणीत दिसून आला. एप्रिलमध्ये ३.८४ टक्के नोंदवलेली अन्नधान्यांच्या किमतीतील वाढ ही मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर घसरली. ग्राहक किंमत निर्देशांकांत जवळपास निम्मा वाटा हा अन्नधान्य घटकाचा आहे. बरोबरीने इंधन आणि विजेच्या महागाईचा दरही एप्रिलमधील ५.५२ टक्क्यांवरून मागील महिन्यात ४.६४ टक्क्यांवर आला.

व्याजदर कपात शक्य?

गेल्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना रेपो दर ६.५ टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवून चलनवाढीतील ताज्या उताराच्या शाश्वततेबद्दल साशंकता व्यक्त केली. ’महागाईवर ‘अर्जुनासारखा नेम’ रोखून धरणे गरजेचे असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते.
’चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ चलनवाढीचा दर सरासरी ५.१ टक्के आणि एप्रिल ते जून तिमाहीत तो ४.६ टक्क्यांवर राहण्याचे मध्यवर्ती बँकेचे अनुमान आहे. प्रत्यक्षात मे महिन्याची आकडेवारी ही या अंदाजाहून अधिक घसरण दर्शविणारी आहे.’एल-निनोच्या परिणामाच्या शक्यता असतानाही यंदा पाऊसपाणी सामान्य राहिल्यास, महागाई दराच्या घसरणीचा क्रम टिकून राहील आणि नजीकच्या काळात व्याजदर कपातही दिसून येईल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.