राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी भीषण अपघात घडला. रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या प्रवासी बसला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली आहे. या दुर्दैवी घटनेत अकरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.
गुजरातहून मथुरेच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी बसमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे संबंधित बस महामार्गावर उभी होती. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे.
या भीषण अपघाताची माहिती समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वर (ट्विटर) लिहिलं की, भरतपूर येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधानांनी PMNRF मधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. तर अपघातात जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील.