West Bengal Medical College Student Rape Case: पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिह्यातील दुर्गापूर येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर शुक्रवारी रात्री तिच्याच महाविद्यालयाच्या संकुलात बलात्कार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०२४ मध्ये घडलेल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि यावर्षी विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयातच अशाप्रकारची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची ओडिशाची राहणारी आहे. शुक्रवारी रात्री ती तिच्या मित्रासह संकुलाच्या बाहेर आली होती. तेव्हा तिला काही जणांनी संकुलाच्या मागे असलेल्या झुडुपात ओढत नेले आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

राजधानी कोलकातापासून १७० किमी अंतरावर असलेले दुर्गापूर हे पश्चिम बंगालमधील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र आहे. अशा महत्त्वाच्या शहरात ही घटना घडल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अद्याप या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्य कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आणि पीडितेबरोबर असलेल्या तिच्या मित्राची चौकशी केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी पीडितेला संकुलाबाहेर जाण्याची परवानगी कशी काय देण्यात आली? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

पीडितेच्या वडिलांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप

पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना महाविद्यालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “काल रात्री मला महाविद्यालयातून फोन आला. माझ्या मुलीवर बलात्कार झाला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. मी आज सकाळी इथे पोहोचलो. रुग्णालयात पाहतो तर माझी मुलगी गंभीर स्थितीत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.”

शुक्रवारी रात्री काय घडले?

पीडितेच्या वडिलांनी पुढे सांगितले, शुक्रवारी रात्री मुलगी पाणीपुरी खाण्यासाठी संकुलाच्या बाहेर गेली होती. तिथून आल्यानंतर महाविद्यालयाच्या गेटवर मैत्रीणीशी बोलत असताना चार ते पाच जणांनी तिला ओढून नेले. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा मोबाइल फोन हिसकावून घेतला. मोबाइल परत देण्यासाठी त्यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तिच्या मित्राने नंतर तिची सोडवणूक केली.

माझ्या मुलीला डॉक्टर बनवून लोकांची सेवा करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते. यासाठी आम्ही इथे महाविद्यालयात तिला पाठवले. आमच्या मुलीबरोबर घडलेली घटना कुणाही मुलीबरोबर घडू नये, आम्हाला न्याय हवा आहे. महाविद्यालयाच्या संकुलात योग्य सुरक्षा नाही, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला.