पश्चिम आफ्रिकेतून अपहरण झालेल्या जहाजाची सुटका करण्यात यश आले असून या जहाजावर २२ भारतीय कर्मचारी होते. सर्व कर्मचारी सुखरुप असून शोधमोहीमेत मदत केल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नायजेरिया सरकारचे आभारही मानले आहेत.
‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ हे जहाज रविवारी बेनिनच्या समुद्रात गायब झाले होते. जहाजात तेलाचे टँकर होते. बेनिनच्या कोटोनाऊ येथून जहाजाचा संपर्क तुटला होता. या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय होते. भारतीय यंत्रणांनी बेनिन आणि नायजेरियन अधिकाऱ्यांना त्याबाबतची सुचना दिली होती. तसेच तटरक्षक दलानेही या जहाजाचा शोध सुरु केला होता. या जहाजाचे अपहरण झाल्याची शक्यता होती. अखेर या जहाजाचा शोध लागला आहे. जहाजाची सुटका करण्यात आली असून जहाजावरील सर्व कर्मचारी सुखरुप आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/960745926468907009
https://twitter.com/SushmaSwaraj/status/960746256183083008
जहाजाचे अपहरण कोणी केले होते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. गेल्या महिनाभरात याच सागरी मार्गावर समुद्री चाच्यांनी दोन जहाजांचे अपहरण केले होते. त्यामुळे या मार्गावरील जहाजांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. ‘एमटी मरिन एक्स्प्रेस’ या जहाजात १३, ५००० टन गॅसोलिन होते.