Mexico City Gen G Protest : बांगलादेश व नेपाळमध्ये झालेलं तरुणांचं आंदोलन (जेन-झी आंदोलन) आणि त्यातून झालेलं सत्तांतराचं उदाहरण ताजं असतानाच आता अमेरिकेच्या शेजारी असलेल्या एका देशातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी (१५ नोव्हेंबर) मेक्सिको सिटीच्या रस्त्यावर अचानक हजारो लोक जमले. हातात फलक, चेहऱ्यावर संताप आणि वेगवेगळ्या घोषणा देत त्यांनी आंदोलन सुरू केलं. जेन-झी तरुण (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली मुलं) या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते.

मेक्सिकोमधील वाढती गुन्हेगारी, वाढलेला भ्रष्टाचार व सरकारविरोधात तरुणांनी हे आंदोलन पुकारलं आहे. तरुणांचं हे आंदोलन पाहून विरोधी पक्षांचे नेते व वृद्ध नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस व आंदोलकांमध्ये हिंसक झडप झाली. याचे वेगवेगळे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव

दरम्यान, आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलक आणखी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी आंदोलकांनी थेट पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे या आंदोलनाला गालबोट लागलं आहे. लाठीहल्ल्यानंतर पोलीस जमाव पांगवण्यात यशस्वी झाले.

“देशाला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करा”, आंदोलकांची मागणी

या आंदोलनात सहभागी झालेले २९ वर्षीय व्यवसाय सल्लागार आंद्रेस मास्सा म्हणाले, “आम्हाला आमच्या देशात सुरक्षा हवी आहे. देश अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त व्हावा, भ्रष्टाचारापासून आपली सुटका व्हावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.” समुद्री चाच्यांच्या झेंडा (कवटी व तलवारीचं चित्र असलेला काळा झेंडा) घेऊन मास्सा या आंदोलनात सहभागी झाले होते. हा झेंडा आता मेक्सिकोमधील जेन-झी आंदोलनाचा झेंडा बनला आहे.

सुरक्षिततेची मागणी

दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या ४३ वर्षीय डॉ. क्लॉडिया क्रूझ म्हणाल्या, “आम्ही शासकीय आरोग्य व्यवस्थेसाठी निधी आणि सुरक्षिततेची मागणी करत आहोत. सध्या डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण नाही.” दुसऱ्या बाजूला देशातील अनेक हाय प्रोफाइल हत्यांमुळे जनतेचा रोष वाढला आहे. मेक्सिकोमधील मिचोआकनचे महापौर कार्लोस मांझो यांची अलीकडेच हत्या झाली आहे. तेव्हापासून जनता संत्पत झाली आहे.

मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लाउडिया शेनबॉम यांनी या आंदोलनापूर्वी आरोप केला होता की उजव्या विचारसरणीचे पक्ष जेन-झी आंदोलनाच्या माध्यमातून हिंसा करू पाहतायत, देशात घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान, काही जेन-झी इन्फ्लुएन्सर्सनी या आंदोलनापसून आंतर राखलं आहे. तर, मेक्सिकोचे माजी अध्यक्ष विसेन्टे फॉक्स व अब्जाधीश रिकाडो सालिनास प्लिएगोसारख्या दिग्गजांनी या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.