मोबाइल फोनवर पॉर्न व्हिडिओची सहज उपलब्धता आणि समाजाची विकृत मानसिकता ही बलात्कारासाठी जबाबदार कारणं आहेत, असं वक्तव्य गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी केलंय. सुरत येथील एका कार्यक्रमात बोलताना संघवी म्हणाले की, “बलात्काराच्या घटनांसाठी आपण नेहमीच पोलिसांना दोषी ठरवतो. अशा घटना समाजावरील कलंक असतात. अशा घटनांसाठी आपण फक्त पोलिसांनाच दोष देऊ शकत नाही. आपल्या देशात गुजरात सर्वात सुरक्षित आहे. पण कितीही सुरक्षित असले तरी आपल्या शहरात किंवा राज्यात एक किंवा दोन अशा घटना घडल्या तर त्या खपवून घेतल्या जाऊ शकत नाहीत.”
हर्ष संघवी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, भारतात बलात्काराच्या मोठ्या घटनांमागे मोबाईल फोन आणि ओळखीचे लोकांनी हे गुन्हे करणं ही प्रमुख कारणे आहेत. “जेव्हा एखादा बाप आपल्या लहान मुलीवर बलात्कार करतो, ही एक मोठी सामाजिक समस्या नाही का? जर एखाद्या बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला तर त्याचे कारण त्याचा मोबाईल आहे,” असं ते म्हणाले.
दरम्यान, भारतातील बलात्काराच्या घटना वाढण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे शेजारी आणि कुटुंबातील सदस्यांसारखे ओळखीचे लोक. सहसा असेच लोक विशेषत: लहान मुलींच्या बाबतीत गुन्हेगार असतात आणि अशी कृत्य करतात, असं हर्ष संघवी यांनी म्हटलंय.