कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा चावा घेण्यात यशस्वी ठरल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बुंदेलखंडमधील डासांचे अभिनंदन केले. मोदी यांच्या या उपहासात्मक टीकेमुळे कॉंग्रेस आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध पुढील काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी सोमवारी राज्याच्या दौऱयावर आहेत. सागरमधील जाहीर सभेत त्यांनी राहुल गांधींवर उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, शहजाद्यांचा चावा घेण्याचे धाडस दाखविल्याबद्दल मला डासांचे अभिनंदन करायचंय. गेल्या १०० वर्षांत त्यांच्या कुटुंबामधील कोणीही राहुल गांधी यांना स्पर्शही केलेला नाही. जर कोणी गांधी घराण्याबद्दल ब्र देखील काढला, तर त्यांचे समर्थक तुमच्यावर तुटून पडतात.
गेल्या महिन्यात याच भागात झालेल्या जाहीर सभेच्यावेळी राहुल गांधी यांनी २००९ मध्ये दौऱयावर आलेलो असताना आपल्याला डास चावले होते, असे सांगितले होते. तोच मुद्दा पकडून मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.