गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे मात्र कळू शकलेले नाही. मोदी यांची प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी अडवाणी यांनी आपल्या तीन पदांचा राजीनामा दिला होता. पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी अडवाणी यांची भेट घेण्याला महत्त्व प्राप्त झाले.
पक्षात मोदी आणि अडवाणी यांच्यामध्ये वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मोदी यांच्या निवडीला विरोध करण्यासाठीच अडवाणी यांनी राजीनामा दिला होता आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.
मोदी यांच्या निवडीनंतर संयुक्त जनता दलानेही भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यातील भाजपमधील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.
गुजरात राज्याच्या वार्षिक आराखड्यावर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंह अहलुवालिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी नरेंद्र मोदी दिल्लीत आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणींमध्ये तासभर चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, हे मात्र कळू शकलेले नाही.

First published on: 18-06-2013 at 11:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi meets advani as bjp tries to normalise party affairs after goa meet