पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबर २०२३ रोजी विविध कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतील १० कोटी व्या लाभधारकाच्या घरी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी त्या कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद घेतला. भेट घेतल्यानंतर मोदींनी आता त्या कुटुंबाला पत्र लिहिले असून घरातील लहान मुलांसाठी खेळणीही भेट म्हणून पाठवली आहेत.
३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीरा मांझी यांच्या घरी भेट दिली होती. तिथे जाऊन त्यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. आता नवीन वर्षाच्यानिमित्ताने मोदींनी मीरा मांझी यांना पत्र लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच, त्यांनी लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आणि खेळणी पाठवले असल्याचं मीरा मांझी यांनी सांगितलं.
मीरा मांझी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मला खूप छान वाटलं. त्यांनी पत्राद्वारे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आमच्या मुलांचा हा सन्मान आहे. त्यांनी एक पत्र पाठवलं आहे. यावेळी आम्ही फार आनंदात असून खूप छान वाटत आहे.
हेही वाचा >> मोदींनी भेट दिलेल्या कुटुंबातील महिलेची प्रतिक्रिया; म्हणाली, “अधिकारी आले अन् म्हणाले पुढच्या अर्ध्या तासात…”
“मलाच नव्हे तर मांझी नगरसाठी त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. लहान मुलांना बॅग, पेन्सिल, टिफीन असं शैक्षणिक साहित्य त्यांनी पाठवलं आहे. आता त्यांनी माझ्या पतीला लहान-मोठी नोकरी द्यावी. त्यामुळे माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल”, असं मीरा मांझी म्हणाल्या.
नरेंद्र मोदींनी पाठवलेल्या पत्रात काय आहे?
तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू श्रीरामाच्या पावन नगरीत अयोध्येत तुम्हाला आणि तुमच्या परिवाला भेटून आणि तुमच्या हातची चहा पिऊन फार प्रसन्न वाटलं.
अयोध्येतून आल्यानंतर मी अनेक टीव्ही चॅनेलवर तुमच्या मुलाखती पाहिल्या. यामध्ये तुम्ही आणि तुमचा परिवारातील सदस्यांनी आत्मविश्वास आणि जितक्या सहजतेने तुम्हाला आलेला अनुभव शेअर केला हे पाहून छान वाटलं. तुमच्यासारख्या कोट्यवधी कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर असंच हासू ठेवणं ही माझी संपत्ती आहे. तुमच्यामुळेच मला देशासाठी मनापासून काम करण्याची ऊर्जा मिळते.
उज्ज्वला योजनेचे १० कोटी वा लाभार्थी बनणं हा फक्त एक आकडा नाही, तर देशातील मोठ्या मोठ्या स्वप्नांना आणि संकल्पांना पूर्ण होण्याच्या उद्देशाने हे पाहतो.
मला पूर्ण विश्वास आहे की अमृत कालमध्ये तुमच्या सारख्या आकांक्षांनी परिपूर्ण कोट्यवधी देशवासियांचा उत्साह विकसित भारत निर्माणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. मुलांच्या चांगल्या स्वास्थ्या आणि उज्ज्वल भविष्याची मी प्रार्थना करतो.