Monkeypox in India : मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.तर आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली असून या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा ही वेळ आली आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांत पसरत असलेल्या या साथीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे की, “संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. मंकीपॉक्सचे विषाणू असलेल्या देशातून त्याने प्रवास केल्याने हा संशय बळावला आहे.”

आरोग्य विभागाच्या नियमानुसार रुग्णाला विलग करण्यात आले आहे. संभाव्य स्त्रोत ओळखण्यासाठी आणि संसर्ग जाणून घेण्याकरता संपर्क ट्रेसिंग चालू आहे, असंही मंत्रालयाने म्हटलं आहे. सध्या कोणत्याचीह चिंतेचे कारण नाही. कारण हे प्रकरण राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने आयोजित केलेल्या जोखीम मूल्यांकनाशी संबंधित आहे. अशा वेगळ्या प्रवासाशी संबंधित प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे आणि संभाव्य जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहे, असं मंत्रालयाने निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा >> मंकीपॉक्सची साथ किती गंभीर? या संसर्गाला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून का घोषित करण्यात आले?

एमपॉक्स म्हणजे काय?

एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे. एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला, तर किंवा या विषाणूने दूषित झालेले मांस खाल्ले, तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधांद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

एमपॉक्सची साथ सध्या कुठे?

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, काँगोमध्ये एमपॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून, तेथे १५ हजार ६०० जणांना संसर्ग झाला आहे, तर ५३७ जण दगावले आहेत. हा प्रादुर्भाव २०२२ पेक्षा अधिक तीव्र आहे. या रोगामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी ९६ टक्के मृत्यू एकट्या काँगोमध्ये नोंदवले गेले आहेत. या आजाराची लागण प्रथमच बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकेतील देशांतही नोंदवली गेली आहे. ही साथ कशी रोखायची, याबाबत वैद्यकीय जगतात अजूनही पुरेसे ज्ञान निर्माण झालेले नाही. परिणामी, या साथीचा प्रसार जगभरात होण्याची शक्यता असून, अमेरिकेने त्यांच्या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkeypox in india a young patient found identified as a suspect case of mpox sgk