MP High Court prohibits burning Sonam Raghuvanshi and others effigy on Dussehra : दसऱ्याच्या दिवशी मेघालय येथे हनिमूनला गेलेले असताना पतीची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशीचा पुतळा जाळण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने इंदौरमधील दसरा उत्सवाच्या वेळी सोनम रघुवंशीचे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे पुतळे जाळले जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
सोनम रघुवंशीचा पती राजा रघुवंसी हा २३ मे रोजी मेघालयमध्ये त्यांच्या हनिमूनदरम्यान बेपत्ता झाला होता, त्यानंतर २ जून रोजी त्याच मृतदेह डोंगराळ भागात सापडला होता. या प्रकरणात सोनम आणि तिचा कथित बॉयफ्रेंड याच्याबरोबर इतर काही जणांना अटक करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
इंदूर येथील ‘पौरुष’ (People Against Unequal Rules Used to Shelter Harassment) या सामाजिक संस्थेने नुकतेच जाहीर केले होते की, ते ‘शूर्पणखा दहन’ कार्यक्रमासाठी ११ डोकी असलेला एक पुतळा तयार करत आहेत. विशेष म्हणजे या पुतळ्यांना सोनम रघुवंशी हिच्या बरोबरच पती, मुले किंवा सासरच्या लोकांच्या हत्येचा आरोप असलेल्या महिलांचे फोटो लावले जातील. मात्र उच्च न्यायालयाने असे करण्यास परवानगी नाकारली आहे.
एकल सदस्य खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रणय वर्मा यांनी शनिवारी भारतासारख्या लोकशाही देशामध्ये अशी कृती अनुचित असेल आणि प्रतिवादी संविधानाच्या कलम १४ आणि २१ अंतर्गत हमी देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाहीत असे म्हटले आहे. सोनमची आई संगीता रघुवंशी यांनी या संस्थेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
न्यायलायने आदेशात म्हटले की, “जरी याचिकाकर्त्याची मुलगी एका फौजदारी गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपी असेल आणि तिच्याविरुद्ध किंवा तिच्या कुटुंबीयांविरुद्ध प्रतिवादींचा जो काही आक्षेप असेल, तरी अशा प्रकारे पुतळा जळण्यास परवानी दिली जाऊ शकत नाही, ज्यामुळे याचिकाकर्त्याच्या, त्यांच्या मुलीच्या, याबरोबरच तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते.”