करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच आऱोग्य सुविधांचा तुटवडा पडू नये म्हणून अनेक राज्यांमध्ये युद्धस्तरावर काम सुरु आहे. मध्य प्रदेशमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मागील काही कालावधीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री आणि यंत्रणा काम करत आहे. असं असतानाच काही नेते मात्र विचित्र वक्तव्य करुन गोंधळ उडवून देतानाचं चित्रही दुसरीकडे पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमधील एका नेत्याने नुकतचं गोमूत्र प्यायलाने करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण बरा होतो असा दावा केला होता. यावरुन बराच वादही झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या मंत्री उषा ठाकुर यांनी करोनाची तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी अजब सल्ला दिलाय. करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व लोकांनी सकाळी १० वाजता यज्ञ करावा असा सल्ला उषा यांनी दिलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशलाही देशातील इतर राज्यांप्रमाणेच करोनाचा मोठा फटका बसला आहे. राजधानी भोपाळबरोबरच अन्य शहरांमध्ये करोनामुळे शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. भोपाळमधील करोनामुळे मरण पावलेल्या मृतांवर करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराचे फोटो संपूर्ण देशात आणि जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरले. आता शिवराज सरकार करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीचं नियोजन करत आहे. असं असतानाच राज्याच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्री उषा ठाकुर यांनी करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यज्ञ करण्याचा सल्ला दिलाय. यज्ञ करणं ही भराताची सनातन आणि पुरातन परंपरा असल्याचं सांगत ठाकूर यांनी किती वाजता यज्ञ केला पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे.

“यज्ञ केल्याने करोनाची तिसरी लाट भारताला स्पर्शही करणार नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सर्व तयारी केली आहे. सर्व प्रयत्न करुन आम्ही ही साथ आटोक्यात आणू,” असा विश्वास उषा यांनी व्यक्त केलाय. “सर्वांनी पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी यज्ञ करावं. आता १०,११,१२ आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता यज्ञ करावा. यज्ञ ही चिकित्सा आहे. यज्ञ हे कर्मकांड आणि अंधश्रद्धा नाहीय तर पर्यावरण शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे,” असं उषा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

उषा यांनी करोनासंदर्भात असं विचित्र विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. यापूर्वीही त्यांनी मास्क घालण्यासंदर्भात विचित्र वक्तव्य केलं होतं. मध्य प्रदेश सरकारने मास्क घालण्यासंदर्भातील जनजागृती मोहीम हाती घेतली असताना एकदा मास्क न घालताच उषा या प्रसारमाध्यमांसमोर आल्या असता त्यांना मास्क न घालताच फिरत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना “मी रोज प्राणायाम करते आणि सप्तशती पाठ करते त्यामुळे मला करोना होणार नाही,” असं उषा म्हणाल्या होत्या.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp minister usha thakur says yadnya will help india to fight 3rd wave of coronavirus scsg