देशाच्या वेगवेगळ्या भागातून गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुणी समलैंगिक प्रेयसीशी लग्न करता यावं, म्हणून लिंगबदल करण्यासाठी मांत्रिकाकडे गेली असता तिच्या प्रेयसीनंच मांत्रिकाच्या मदतीने तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहानाबाद जिल्ह्यातला हा प्रकार आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
शाहजहानाबादमघील आरसी मिशन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहणाऱ्या पूनमचे पुवायन भागात राहाणाऱ्या प्रीती नावाच्या तरुणीशी प्रेमाचे संबंध होते. पूनमला प्रीतीशी लग्न करायचं होतं. पण त्यांच्या या समलैंगिक संबंधांबाबत वाच्यता झाल्यानंतर प्रीतीच्या कुटुंबीयांना तिचं लग्न लावून देण्यात अडचणी येऊ लागल्या.
या सगळ्यावर प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांनी एक गंभीर उपाय पूनमला सांगितला. किंबहुना हा उपाय नसून एका गुन्ह्याचा कटच होता. प्रीतीनं पूनमला लिंगबदल करून घेण्याची विनंती केली. यासाठी जवळच्याच रामनिवास नावाच्या मांत्रिकाची गाठही घालून दिली. यानंतर प्रीतीनं तिची आई आणि रामनिवास यांच्या मदतीने पूनमच्या हत्येचा कट रचला.
मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….”
लिंगबदलाचा बनाव आणि हत्या!
प्रीतीच्या शब्दांवर विश्वास ठेवून पूनमनं रामनिवासकडून लिंगबदलाचे विधी करून घेण्याची तयारी दर्शवली. १८ एप्रिल रोजी पूनम रामनिवासकडे विधी करून घेण्यासाठी आली. रामनिवासनं तिला जवळच्या जंगलात नेलं. तिथल्या नदीच्या काठावर तिला सरळ डोळे मिटून झोपायला सांगितलं आणि संधीचा फायदा घेऊन पूनमची गळा चिरून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह बाजूच्या झुडुपांमध्ये टाकून रामनिवासनं तिथून पोबारा केला.
कसा लागला गुन्ह्याचा छडा?
१८ एप्रिलला पूनमनं घर सोडलं. पण तेव्हापासून ती गायबच असल्यामुळे तिच्या भावानं पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात पूनमचं प्रीती आणि रामनिवास यांच्याशी बोलणं झाल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी रामनिवासला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली. या चोकशीदरम्यान रामनिवासनं आपला गुन्हा कबूल केला. यानुसार, मंगळवारी रामनिवास आणि प्रीतीला पोलिसांनी अटक केली. प्रीतीची आई उर्मिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.