काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाचे नेते गौहर हुसैन भट यांची हत्या करणाऱ्या चार संशयीत दहशतवाद्यांची ओळख पटली असून यांपैकी दोन जण लष्कर-ए-तोयबाचे तर इतर दोन जण हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे सदस्य आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ३०२, ३४ आरपीसी, १६ युएसए (पी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

https://twitter.com/ANI/status/926443004339949568
दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गुरुवारी (२ नोव्हेंबर) ही हत्या घडवून आणली. भट यांचा मृतदेह किलूरा भागातील एका बागेत सापडला होता. दहशतवाद्यांनी हि हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. गळा चिरुन त्यांना ठार मारण्यात आले होते.

https://twitter.com/ANI/status/926443324684189696
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून, भाजप नेत्यांनी या हत्येविरोधात राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानच्या विरोधात आज निदर्शने केली. भाजपा आमदार रविंद्र रैना यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मार्चात पाकिस्तान आणि दहशतवादविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. दहशतवाद्यांना डरपोक असल्याचे सांगत रैना म्हणाले, हत्येचा हा प्रकार काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबण्याचा एक प्रयत्न आहे.